घोटाळा चौकशीतून कर्मचारी सुटणार?
By Admin | Published: July 16, 2016 11:14 PM2016-07-16T23:14:27+5:302016-07-16T23:34:27+5:30
वसंतदादा बॅँक : सहकार विभागाकडेही पाठपुरावा सुरू
सांगली : सहकार विभागाने वसंतदादा बॅँकेच्या दोन अधिकाऱ्यांना १७० कोटीच्या घोटाळ््यातून वगळल्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही याबाबत आता सहकार विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. निर्णय प्रक्रियेत नसलेले असे सर्व कर्मचारी आता या प्रक्रियेतून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या १७० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरू होती. चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी घेतलेल्या सुनावणीवेळी कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी आकारले जाणारे शुल्क अनाठायी असल्याची तक्रार काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली होती. बॅँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक माधव गोगटे व मनोहर कावेरी यांनी याबद्दलच सहकार विभागाकडे अपील दाखल केले होते. चौकशी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच हे अपील दाखल झाल्यानंतर सहकार विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या चौकशीला तात्पुरती स्थगिती दिली होती. २८ आॅक्टोबर २०१५ रोजी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अपिलावर सुनावणी झाली होती. दरम्यान, या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रकरणातून वगळण्यासाठीही अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देत सहकार विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशी प्रक्रियेतून वगळले आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांनीही आपणास वगळण्याची मागणी चौकशी अधिकारी केली आहे. सहकार विभागाकडेही या कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. चौकशीच्या फेऱ्यात आता ७१ कर्मचारी अडकले आहेत. यातील निर्णय प्रक्रियेत नसलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना सहकार विभागाकडून वगळले जाण्याची शक्यता दिसत आहे. (प्रतिनिधी)