सांगली बाजार समितीचा 'तो' कर्मचारी निलंबित, कामावरून सुटी करण्यासाठी उशिरा आल्याने झाला होता वाद
By अशोक डोंबाळे | Published: April 1, 2024 06:21 PM2024-04-01T18:21:48+5:302024-04-01T18:22:05+5:30
प्रशासनाकडून कारवाई : चौकशी करुन पुढील कारवाई होणार
सांगली : कामावरून सुटी करण्यासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाद झाला. यावेळी संशयित विश्वेश गजानन आंबी (रा. गावभाग, सांगली) याने फरशीच्या तुकड्याने शिपाई सूर्यकांत तुकाराम कदम (रा. कोळीवाडी, कसबे डिग्रज, ता. मिरज) याला मारहाण केली. यानंतरही कर्मचाऱ्यांना धमकावणे आंबी यांच्याकडून सुरूच असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि सचिव महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शिपाई म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत कदम हे शुक्रवारी (दि. ८) रात्री १० वाजता आवारात थांबले होते. संशयित विश्वेश आंबी आल्यानंतर मला सोडण्यासाठी उशिरा का आलास, अशी फिर्यादीने विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
तेव्हा आंबी याने तेथे पडलेला फरशीचा तुकडा घेऊन कदम यांना मारहाण केली. यामध्ये कदम जखमी झाले. उपचारानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार आंबीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतरही आंबी यांनी कदम यांना मोबाइलवर फोन करून धमकी देत आहेत. म्हणूनच आंबी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी समिती नेमून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.