सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार अडीच पगार बक्षीस, तीन पगारांच्या मागणीवर कर्मचारी ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:46 PM2023-05-06T12:46:10+5:302023-05-06T13:01:43+5:30
जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान
सांगली : जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन पगार बक्षीस दिला जातो, यात यंदा अर्ध्या पगाराची भर पडली आहे. यावेळी अडीच पगार बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नफ्यामध्ये तरतूद केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे. कर्मचाऱ्यांनी चार पगारांची मागणी केली होती. किमान तीन पगार तरी मिळावेत यासाठी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. ग्राहकांना दैनंदिन सेवा देण्याबरोबच ठेव वाढ व कर्जवसुलीचेही कर्मचाऱ्यांना उदिष्ट दिले जाते. प्रतिकर्मचारी व्यवसाय वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. दरवर्षी बँकेचा नफा जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन पगार बक्षीस म्हणून जाहीर केले जातात. यातील एक पगार मे-जूनमध्ये दिला जातो तर दूसरा पगार बोनस म्हणून दिवाळीवेळी मिळतो.
मागील काही वर्षांपासून जिल्हा बँकेने सव्वाशे कोटींंवर नफा मिळवण्यास सुरवात केली आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या वसुलीचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे दरवर्षी कर्मचारी संघटना तीन ते चार पगार बक्षीस देण्याची मागणी करतात पण संचालक मंडळ ती मान्य करत नाही. कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दोन पगार बक्षीस व दोन पगार बोनस देते. सांगली जिल्हा बँकेनेही याची अंमलबजावणी करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
कर्मचाऱ्यांचे हे योगदान अध्यक्ष व सीईओंनही मान्य केले. त्यामुळे यंदा तरी कर्मचाऱ्यांना तीन ते चार पगार बक्षीस मिळतील अशी आशा होती तशी मागणी कर्मचारी संघटनेच्यावतीने अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक व सीईओ शिवाजीराव वाघ यांच्याकडे केली होती. पण ही मागणी धुडकावत अडीच पगार बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ अर्धा पगार वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत मोठी नाराजी असून किमान तीन पगार मिळावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेला १३४ कोटींचा नफा
जिल्हा बँकेने यंदा मार्च २०२३ अखेर १३४ कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे. मात्र, यंदा बिगर शेती संस्थांकडून कर्जवसुलीस फारसे सहकार्य मिळाले नाही. शेती कर्जाची मात्र जोमात वसुली झाली. ही वसुली करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले. प्रसंगी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वसुलीसाठी प्रयत्न केले.