कर्मचाऱ्यांनी वसंतदादा कारखान्याचे ब्रँड अॅम्बॅसिडर बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:15+5:302021-01-02T04:23:15+5:30
वसंतदादा कारखान्यातील १०३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी विशाल पाटील बोलत होते. दत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, परिक्षित रुपारेल, ...
वसंतदादा कारखान्यातील १०३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी विशाल पाटील बोलत होते. दत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू, परिक्षित रुपारेल, अमोल शिंदे, व्यवस्थापक शरद मोरे, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापक संजय पाटील, युनियनचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, उपाध्यक्ष दिलीप गोरे, खजिनदार संजय खराडे, कार्याध्यक्ष अरुण संकपाळ, घनश्याम पाटील, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
विशाल पाटील पुढे म्हणाले की, ८३० भविष्यनिर्वाहसह गॅच्युईटीचे २३ कोटी रुपये दिले आहेत. काही कर्मचाऱ्यांची किरकोळ देणी राहिली असून, तिही देण्यात येणार आहेत. एक रुपयाही थकीत राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेतली आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच दत्त इंडिया कंपनीने वसंतदादा कारखाना यशस्वी चालू ठेवला आहे. यापुढे वसंतदादा कारखान्याची जनतेमध्ये प्रतिमा उंचाविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून काम करण्याची गरज आहे.
मृत्युंजय शिंदे म्हणाले की, वसंतदादा कारखान्यातील प्रामाणिक कामगारांमुळेच दत्त इंडियाने गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. यापुढेही उच्चांकी गाळप करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विलास पाटील यांनी आभार मानले.
चौकट
वसंतदादा कारखान्याची बदनामी थांबवा : प्रदीप शिंदे
वसंतदादा कारखान्यातून राख पडत होती; पण सध्या आधुनिक यंत्रणा बसविल्यामुळे राख पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही प्रदूषण अधिकाऱ्यांसह संघटनांकडून केवळ वसंतदादा कारखान्यास टार्गेट करून बदनामी केली जात आहे. वसंतदादा कारखान्यावरच कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी सुरू आहे. सभासदांच्या घामाचा कारखाना कुणी बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर कामगार आणि सभासद रस्त्यावर येऊन विरोधकांचा हा डाव उधळून लावतील, असा इशाराही वसंतदादा साखर कामगार युनियनचे सरचिटणीस प्रदीप शिंदे, धनश्याम पाटील यांनी दिला.