कामेरीच्या पियुषला हवाय मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 12:26 AM2016-02-11T00:26:21+5:302016-02-11T00:32:17+5:30
थॅलेसेमियाचा आजार : ‘ब्रेन मॅरो’ शस्त्रक्रियेसाठी वीस लाखांची गरज
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील पांडुरंग माळी या शेतमजुराचा आठ वर्षांचा मुलगा पियुष याला खेळण्या-बागडण्याच्या वयात थॅलसेमिया आजार जडला आहे. वेळीच उपचार झाले नाहीत, तर त्याला प्राण गमवावा लागणार आहे. या आजारावर ब्रेन मॅरो ट्रान्सप्लांटेशन ही शस्त्रक्रिया करावी लागणार असून, यासाठी अंदाजे २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक, सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी माळी कुटुंबियांनी केली आहे.
येथील शेतकरी कुटुंबातील पांडुरंग माळी यांचा तिसरीत शिकणारा मुलगा पियुष शाळेत अत्यंत हुशार आहे. सतत हसत असणाऱ्या, घरातील सर्वांच्याच मनात लाघवी बोलण्याने वेगळेच स्थान निर्माण करणाऱ्या पियुषला थॅलसेमिया हा आजार जडला आहे. सध्या त्याच्या शरीराची आतून कणा-कणाने झिज सुरू आहे. त्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. यासाठी त्याच्यावर बोन मॅरो ही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तरच त्याची या आजारातून मुक्तता होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (वार्ताहर)
दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज
या शस्त्रक्रियेसाठी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा डीएनए मिळता-जुळता असेल, तरच ही अवघड शस्त्रक्रिया होते. या निकषानुसार पियुषचा अडीच वर्षाचा भाऊ आयुष याची या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. भावाचा बोन मॅरो घेऊन पियुषचा जीव वाचविला जाणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ही शस्त्रक्रिया बेंगलोर येथे होणार आहे. हा खर्च करणे माळी कुटुंबियांना अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती माळी कुटुंबियांनी केली आहे.