उपनगराध्यक्षांकडूनच सत्ताधाऱ्यांचे वाभाडे

By Admin | Published: March 29, 2016 11:22 PM2016-03-29T23:22:52+5:302016-03-30T00:01:44+5:30

इस्लामपूर पालिका सभा : निवडणुकांमुळे नोकऱ्यांना मंजुरी

Empowering the leaders of the sub-head | उपनगराध्यक्षांकडूनच सत्ताधाऱ्यांचे वाभाडे

उपनगराध्यक्षांकडूनच सत्ताधाऱ्यांचे वाभाडे

googlenewsNext

इस्लामपूर : नगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्ताधाऱ्यांनी विशेष सभेत नोकऱ्या देण्याचे विषय मंजूर करुन घेतले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग एकसह उरुण परिसरातील २० रस्तेकामांना मंजुरी दिली. मात्र याचवेळी उपनगराध्यक्षांच्या खुर्चीचा त्याग करून सदस्यांसमवेत बसलेल्या उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. कायदेशीर मार्गदर्शन घेण्याच्या मुद्द्यावर कोरे आणि नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्यामध्ये शेरेबाजी झाली.
पालिका सभागृहात मंगळवारी नगराध्यक्ष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत सभा झाली. चौघांना वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्याचा, तर अनुकंपा तत्त्वाखाली चार वारसांना नियुक्ती देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला. कोरे यांनी एकूण किती अर्ज आले, त्यातील पात्र किती अशी विचारणा केली. मुख्याधिकाऱ्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन हा विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले. त्यावर कोरेंनी पदावर जबाबदार असणाऱ्यांनी यापूर्वी शासनाची फसवणूक केल्याचा टोला मारला. शहरात विजेचे खांब उभा करणे व तारा ओढण्याच्या विषयावर कोरे यांनी यापूर्वीची मंजूर कामे सुरु झाली का? सभागृहाने मंजुरी देऊनही ठेकेदार काम करीत नसेल, तर त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली. पालिका हद्दीबाहेर विजेचे खांब टाकू शकतो का? असे खांब उभे केल्यास ते बेकायदेशीर आहे का? या बेकायदेशीर कामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार का? अशी विचारणा केली. मुख्याधिकारी झिंजाड यांनी ही बाब पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिल्यास कारवाई करु, असे सांगितले.
मारुती मंदिराजवळील व्यापारी गाळ्यांमध्ये विस्थापितांना गाळे देण्याच्या विषयाला विरोधी गटाच्या विजय कुंभार यांनी विरोध दर्शवला. त्यावर खंडेराव जाधव यांनी विस्थापितांना गाळे देण्याचा ठराव करुन ते शासनाच्या मंजुरीसाठी पाठवा, अशी सूचना केली.
शहरात किती मोबाईल टॉवरच्या विषयाला हात घालत कोरे यांनी नगररचना विभागाकडे मोर्चा वळवला. फक्त एक टॉवर परवानगीचा आहे. इतरांचे काय? उत्पन्नाचा मोठा स्रोत बुडत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुरुवातीपासून आक्रमक राहिलेल्या कोरे यांनी पुन्हा आपल्या प्रभाग क्रमांक पाचमधील रस्ते कामाच्या विषयावरुन सत्ताधारी गटासह प्रशासनाचे वाभाडे काढले. पाठीमागून आलेले विषय मंजूर होऊन ती कामे पूर्ण होतात. ठेकेदार पैसे घेऊन मोकळे होतात. हा काय प्रकार आहे, अशा शब्दात बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सौ. मिनाज मुल्ला यांनी रस्त्याकडेला खडी पडली आहे. खड्डे कधी मुजवणार, अशी विचारणा केली. (वार्ताहर)


अध्यक्ष, काय खुळा नाही!
रस्ते कामाच्या विषयावरुन उपनगराध्यक्ष कोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून पुस्तक घ्या, पान क्रमांक १२० बघा. कायदा ८१/४/अ काय सांगतो. नगराध्यक्षांना मार्गदर्शन करा, असे सांगताच नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी अध्यक्ष काय खुळा नाही, अशी टिपणी केली. त्यावर कोरे यांनी मी तुम्हाला खुळा म्हणलेले नाही. तुम्ही स्वत:च असे का म्हणवून घेता? असा प्रतिप्रश्न केला.

पक्षप्रतोदांना राष्ट्रगीताची घाई!
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या प्रभागातील ७२ लाखांच्या संवेदनशील विषयावर कोरे प्रशासनाकडून नेमक्या उत्तराची मागणी करीत होते. त्यावेळी पाटील राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. इतर सदस्यांनाही उभे राहण्याविषयी खुणावत होेते. मात्र कोेरे यांनी विषय पत्रिकेवर अजून एक विषय आहे, त्यामुळे खाली बसा, अशी कोपरखळी मारली. त्यामुळे सर्वांनाच बसावे लागले. शेवटचा विषय मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मग राष्ट्रगीत झाले.

Web Title: Empowering the leaders of the sub-head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.