हरिपूरच्या पेवांचे पोट रिकामे
By admin | Published: January 17, 2017 12:15 AM2017-01-17T00:15:18+5:302017-01-17T00:15:18+5:30
‘कुलूप नसलेली गोदामे’ संकटात : नैसर्गिक रखवालदारी संपुष्टात
शीतल पाटील ल्ल सांगली
‘टर्मरिक सिटी’ म्हणून सांगलीची ओळख देशात आहे. हा मान मिळवून देणाऱ्या हळदीच्या रखवालीची जबाबदारी हरिपूरच्या पेवांनी अखंडित सांभाळली. मात्र २००५ च्या महापुरात हजारो पेवे नष्ट झाली. तरीही आज तेवढ्याच प्रमाणात ती शिल्लक आहेत. कुलूप नसलेल्या या गोदामांवर कधीकाळी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. आता मात्र ही पेवे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सांगलीपासून तीन किलोमीटर अंतरावरील हरिपूर हे गाव नावारूपाला आले, ते हळदीच्या पेवांमुळे. चार ते पाच लाख क्विंटल हळकुंडे साठवणुकीची क्षमता असलेली अडीच हजारावर पेवे होती. २६ जुलै ते ६ आॅगस्ट २00५ या कालावधित कृष्णा नदीला आलेल्या महापुराने या ऐतिहासिक पेवांना जलसमाधी दिली. अडीच हजारपैकी हजार पेवे वाचली. मात्र गेल्या दहा वर्षात पेवांचे महत्त्व कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेव बंद करून शेतीकडे मोर्चा वळविला आहे. आजही हरिपुरात ३०० ते ४०० पेव आहेत. पण पूर्वीसारखा त्यांचा हळद साठवणुकीसाठी वापर कमी झाला आहे. सध्या १०० ते १२५ पेवांमध्येच हळद साठविली गेली आहे. कुलूप नसलेल्या या गोदामांवर बँकाही विश्वास ठेवून होत्या. या पेवांवर थेट व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा केला जात होता. पण महापुरानंतर ही स्थिती थोडी बदलली. व्यापाऱ्यांनीही पेवांपेक्षा गोदामांना पसंती दिली.
पेव म्हणजे काय?
हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते. थोडासा जरी ओलसरपणा लागला तर ती काळपट लाल होते. त्यामुळे पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीमध्येच घागरीच्या आकाराची कोठारे खणण्यात आली. त्यांनाच पेव म्हटले जाते. हरिपूरची पेवे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाळासारख्या घट्ट असलेल्या या मातीमुळे पेवात पाणी अथवा हवेचा शिरकाव होत नाही. प्राणवायुअभावी तेथे हळदीला कीड लागू शकत नाही. शिवाय हळदीचे वजन वाढून त्याचा रंगही खुलतो. परिणामी चांगल्या प्रतीची हळद चार ते पाच वर्षे टिकून राहते.