अतिक्रमण पथक-भाजी विक्रेत्यात वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:24+5:302021-07-02T04:19:24+5:30
सांगली : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. रस्त्यावर बसून भाजीपाला विक्रीला बंदी आहे, तरीही चांदणी ...
सांगली : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. रस्त्यावर बसून भाजीपाला विक्रीला बंदी आहे, तरीही चांदणी चौकात अनेक विक्रेते रस्त्यावर भाजीपाला विकत आहेत. गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत भाजीपाला जप्त केला. त्यातून विक्रेते व महापालिका कर्मचाऱ्यात जोरदार वादावादी झाली.
महापालिकेने आठवडा बाजार रस्त्यावरील भाजीपाला विक्री बंद केली आहे. नागरिकांना घरपोच भाजीपाला देण्याची सूचनाही विक्रेत्यांना करण्यात आली आहे, तरीही अनेक ठिकाणी विक्रेते रस्त्यावरच बसलेले दिसतात. चांदणी चौकातही आठ ते दहा जण दररोज भाजीपाला विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसलेले असतात. गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने या विक्रेत्याकडील भाजीपाला जप्त केला. त्यातून वादावादीला सुरुवात झाली. महिला विक्रेत्याने तर पथकाच्या वाहनात चढून जप्त केलेला भाजीपाला हिसकावून घेतला. सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी विक्रेते व अतिक्रमण पथकात मध्यस्थी केली. या विक्रेत्यांना खुल्या भूखंडावर जागा देण्याचा निर्णय यावेळी झाला.