शिवाजी मंडई रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:33+5:302021-01-08T05:25:33+5:30
सांगली : शहरातील शिवाजी मंडईजवळील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण चार वर्षांपूर्वी हटविण्यात आले होते; पण आता पुन्हा विक्रेत्यांनी रस्त्यावर ...
सांगली : शहरातील शिवाजी मंडईजवळील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण चार वर्षांपूर्वी हटविण्यात आले होते; पण आता पुन्हा विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे या रस्त्याचा श्वास कोंडला असून, महापालिकेने तातडीने त्यावर उपाययोजना न केल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची भीती आहे.
रिसाला रोडकडून मारुती चौकाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. रस्त्याच्या मधोमधच छत, टेबल टाकून भाजीपाला विक्री सुरू होती. रस्त्याच्या एका कडेला भाजी विक्रेत्यांना जागा दिली असतानाही त्यांनी संपूर्ण रस्त्यावर कब्जा केला होता. महापालिकेने अनेकदा त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय हस्तक्षेपामुळे ते शक्य झाले नव्हते. सहा ते सात वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांनी या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तेव्हाही राजकीय विरोध झाला. पण तो डावलून रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले. तब्बल ३० वर्षांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. महापालिकेच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले होते.
पण आता या रस्त्याचा श्वास कोंडू लागला आहे. विक्रेत्यांनी हळूहळू रस्त्यावर अतिक्रमणास सुरुवात केली आहे. गाळे दिलेले विक्रेतेही रस्त्यावरच भाजीपाला मांडू लागले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनीही अतिक्रमण केले आहे. ग्राहकांची वाहनेही या विक्रेत्यांच्या स्टाॅलसमोरच उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येत आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भीती आहे.
चौकट
आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज
या रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले, तेव्हा उपायुक्तपदी नितीन कापडणीस होते. त्यांच्याकडेच अतिक्रमण विभागाचा पदभार होता. आता ते महापालिकेत आयुक्त म्हणून दाखल झाले आहेत. भाजी विक्रेत्यांना पट्टे मारून देऊन रस्ता वाहतुकीला खुला राहील, याची दक्षता आयुक्तांनी घेण्याची गरज आहे.
फोटो ओळी : शहरातील छत्रपती शिवाजी मंडई रस्त्यावर पुन्हा विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. (छाया नंदकिशोर वाघमारे)