काँग्रेसची कीड संपवा!
By Admin | Published: January 6, 2017 12:17 AM2017-01-06T00:17:58+5:302017-01-06T00:17:58+5:30
सुभाष देशमुख : सांगलीत रस्ते, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची काँग्रेसने वाट लावली आहे. सहकाराची वाट लावणारी काँग्रेसची कीड संपवा, असे आवाहन नूतन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केले.
सांगलीतील विश्रामबाग ते कृपामयी या रस्त्याचे सहापदरीकरण, तसेच कुपवाड ते सूतगिरणी रस्ता कामाचा प्रारंभ व संजयनगर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सुजित काटे, सुभाष गडदे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशमुख म्हणाले की, संजयनगर परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची काँग्रेसने वाट लावली. अनेक सहकारी संस्था संपविल्या. काँग्रेस संपली की सांगलीची कीड संपेल. सांगलीकरांनी काँग्रेसमुक्त शहराचा संकल्प करावा.
देशातील व राज्यातील भाजप सरकारने शेवटच्या माणसाचा उद्धार करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यात २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेत सर्वांनी नोंदणी करावी. मुद्रा योजनेतून तरूणांना कोट्यवधीचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अन्न, वस्त्र व निवारा या जनतेच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या दोन वर्षात आपण नावीन्यपूर्ण योजना राबविणार असल्याची ग्वाहीही देशमुख यांनी दिली.
आ. गाडगीळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षात संजयनगर परिसरात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. ही तर सुरुवात आहे. पुढील तीन वर्षात संजयनगर भागातील एकही काम शिल्लक राहणार नाही.
प्रारंभी श्रीकांत वाघमोडे यांनी स्वागत, तर दीपक माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीता केळकर, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, दरिबा बंडगर, सुजित काटे यांची भाषणे झाली. सुभाष बुवा, किरण सर्जे, सुवर्णा कदम, गंगा तिडके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी दीपक मासाळ, रमेश शिंदे, नूतन मोटे, गजानन सरगर उपस्थित होते. (प्रतिनिधी)