सांगलीच्या हळदीला अखेर जीआय मानांकन-मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडून मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 08:35 PM2018-06-26T20:35:15+5:302018-06-26T20:36:22+5:30
सांगलीच्या हळदीला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन मिळाल्यामुळे आता ‘सांगलीची हळद’ या नावाखाली अन्य कोणत्याही हळदीची विक्री होऊ शकणार नाही.
सांगली : सांगलीच्या हळदीला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन मिळाल्यामुळे आता ‘सांगलीची हळद’ या नावाखाली अन्य कोणत्याही हळदीची विक्री होऊ शकणार नाही. गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर जीआय मानांकनाला अखेर हिरवा कंदील मिळाला असून, बुधवारी मुंबई येथे झालेल्या सुनावणीमध्ये ही मान्यता देण्यात आली.
सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी प्रथम २०१३ मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती. त्याचवेळी वर्धा जिल्'ातील वायगाव येथील शेतकºयांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता. वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते. त्यामुळे सांगलीच्या हळदीचे जीआय मानांकन हुकले होते.नंतर सांगलीच्या हळदीचा फेरप्रस्ताव सादर झाला. भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो.
देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे, सांगलीची हळद म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे पुन्हा केली होती. त्यावर बुधवारी (दि. २६ जून) सुनावणी झाली.
शेतकºयांतर्फे ‘जीआय’ विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाचे सहायक रजिस्ट्रार चिन्नाराजा जी. नायडू यांच्यासमोर सांगलीच्या हळदीच्या वैशिष्ट्यांची मांडणी केली. या सर्वांची बाजू समजून घेतल्यानंतर नायडू यांनी सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर केले.
प्रा. हिंगमिरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, सांगली ही देशातीलच नव्हे, तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. या परिसरात पिकणारी दर्जेदार राजापुरी हळद, दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा वायदेबाजार आदी घटकांमुळे सांगली देशभरातील हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले आहे. या सर्व गोष्टींची मांडणी भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागासमोर केली. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर झाले आहे.
हळदीला मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्टय बाजारपेठेत ‘सांगलीची हळद’ म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे हा सांगलीचा ब्रॅँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकला जाणार आहे. आजवर जगातील १६० देशांनी जीआय मानांकनास मान्यता दिली आहे. ते मानांकन असलेल्या शेतमालाविषयी शंका घेतली जात नाही. शिवाय हे मानांकन मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
जीआय मानांकनामुळे होणारे फायदे...
- सांगली हळदीला जीआय मानांकनाचा कोड मिळणार
- जगातील आजवर १६० देशांची जीआय मानांकनास मान्यता
- आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता
- शेतीमालास प्रतिष्ठा व नेमकी ओळख
- शासनाकडून मानांकन मिळाल्यामुळे गुणवत्तेची खात्री
- मानांकन असलेल्या मालाविषयी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शंका घेतली जात नाही