अखेर ‘त्या’ तरुणाचा मृत्यूशी लढा अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:29 AM2021-02-11T04:29:34+5:302021-02-11T04:29:34+5:30
शिराळा : अपघात होऊन सात दिवस ओघळीत अन्न-पाण्याशिवाय ऊन आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत मृत्यूशी लढा देणाऱ्या रूपेशची झुंज ...
शिराळा : अपघात होऊन सात दिवस ओघळीत अन्न-पाण्याशिवाय ऊन आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत मृत्यूशी लढा देणाऱ्या रूपेशची झुंज अखेर मंगळवारी अकराव्यादिवशी अपयशी ठरली. काेल्हापूर येथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
रूपेश विष्णू कदम (वय २६. रा. अमेणी पैकी खोंगेवाडी. ता. शाहूवाडी) हा तरुण ३० जानेवारी रोजी कोकरूड येथे आला होता. आपल्या मामासोबत हॉटेलमध्ये जेवण करून ताे रात्री खाेंगेवाडीला घरी परतत हाेता. पण तो घरी पाेहाेचलाच नाही. दुसऱ्यादिवशीही ताे घरी न आल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी त्याचा शाेध सुरू केला. १ फेब्रुवारीला कोकरुड पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. तरीही त्याचा शाेध लागत नव्हता. दरम्यान, शनिवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले असताना, शाहीरवाडी येथील सनंदरा शेताजवळ दहा फूट ओघळीत अर्धवट बेशुद्ध अवस्थेत एक तरुण आढळून आला. तो रूपेश असल्याची खात्री पटल्यानंतर त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी त्यास कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पुतण्या, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
फाेटाे : १० रूपेश कदम