जिल्ह्यात गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:17+5:302021-07-14T04:32:17+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोराेनाबाधितांची संख्या कायम असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. वाढतच चाललेली रुग्णसंख्या कमी आणण्यासाठी आता कठोर उपाय आवश्यक ...
सांगली : जिल्ह्यातील कोराेनाबाधितांची संख्या कायम असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. वाढतच चाललेली रुग्णसंख्या कमी आणण्यासाठी आता कठोर उपाय आवश्यक असून जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांनी आता विशेष लक्ष देऊन गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लागू करावेत, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, निर्बंध लागू असतानाही जिल्ह्यात गर्दी कायम आहे. विशेषत: लग्नसमारंभात गर्दी वाढत आहे. यासाठी पोलिसांनी आता ग्रामीण भागात विशेष लक्ष द्यावे. पोलिसांनी आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून कारवाईस सुरुवात करावी, जेणेकरून गर्दी कमी होणार आहे. दीड महिन्यांपासून निर्बंध कायम असल्याने रुग्णांची चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पुन्हा एकदा निर्बंध आणखी कडक करत व गर्दीवर नियंत्रण मिळवून बाधितांची संख्या कमी आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
चौकट
कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम असतानाच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली आहे. दुसऱ्या लाटेतच जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजारावर कायम असल्याने यंत्रणांवर ताण येणार आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्बंध लागू करत परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी केली.