अभियांत्रिकी तरुणाची सांगलीवाडीत आत्महत्या
By Admin | Published: January 29, 2017 11:23 PM2017-01-29T23:23:35+5:302017-01-29T23:23:35+5:30
तिसऱ्या मजल्यावरून उडी; कारण अस्पष्ट
सांगली : अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या सांगलीवाडीतील जगदीश सुभाष जाधव (वय २४) या तरुणाने स्वत:च्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.
जगदीश जाधव हा सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ आई, वडील, मोठा भाऊ व भावजय यांच्यासमवेत राहत होता. त्याने वर्षापूर्वी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याचे कुटुंब मूळचे कोल्हापूरचे आहे. २५ वर्षांपूर्वी ते सांगलीवाडीत स्थायिक झाले आहेत. त्यांचे तीनमजली घर आहे. पहिल्या मजल्यावर वडिलांचा वायनरीचा उद्योग सुरू होता. काही वर्षांपूर्वी हा कारखाना बंद करुन त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयास लागणारे साहित्य तयार करण्याचा कारखाना सुरु केला आहे. या कारखान्याची जबाबदारी जगदीश व त्याचा भाऊ सांभाळत होते.
रविवारी सकाळी घरातील लोक कामात होते. त्यावेळी जगदीश तिसऱ्या मजल्यावरील छतावर गेला व तेथून त्याने उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. त्याचे दोन्ही पाय मोडले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, आत्महत्येच्या कारणाबाबत सांगलीवाडी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)