पालकांना सजग करतेय ‘संवाद’ चळवळ-उपक्रमातून मुलांना प्रगल्भ बनविण्याचा प्रभावी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:43 PM2019-03-23T23:43:14+5:302019-03-23T23:43:59+5:30
ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग
- शरद जाधव ।
सांगली : ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग करणारा, त्यांना प्रश्नांची जाणीव करून देत अधिक प्रगल्भ बनविणारा उपक्रम सांगलीत रूजतोय, ‘संवाद’ चळवळ हे त्याचं नाव! प्रश्न अनेक, उत्तर मात्र एकच या ‘टॅगलाईन’खाली या उपक्रमाचे वर्षभर काम सुरू आहे. त्याला प्रतिसादही मोठा मिळत आहे.
मुलांची ज्ञान घेण्याची जिज्ञासा ताणून न धरता मुलांना हवे ते ज्ञान उपलब्ध करून देण्यासह इतर उद्देश मनाशी धरून येथील अर्चना मुळे यांनी ही चळवळ सुरू केली आहे. मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची कौशल्ये विकसित करणे, मुलांचा व समाजातील त्या-त्या क्षेत्रातील महान व्यक्तींचा सहवास घडवून आणणे, मुलांमधील विविध सुप्त सर्जनशिलतेची जाणीव करून देणे, यासाठी ‘संवाद’च्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.
स्वत: मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या अर्चना मुळे यांना मुले, पालक आणि शिक्षकांतील नाते अधिक सुदृढ करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला व आता सांगलीसह मिरजेतील चाळीसहून अधिकजण या चळवळीत कार्यरत आहेत. ‘संवाद’च्या प्रत्येक उपक्रमाला मुले व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
मुलांवरील ताण समजून घेणे, त्यांचे अभ्यासाचे तंत्र, शिकण्याची गती वाढण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा या संवादात झाली. कौटुंबिक ताणतणावाचा मुलांवर होणारा परिणाम जाणून घेऊन त्यावर मात करण्याचे कौशल्य, मुलांच्या मानसिक, भावनिक आणि लैंगिक प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी व मुलांची चिडचीड, हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांची भूमिका यातून दर्शविण्यात आली.
‘संवाद’ साधून समुपदेशनाबरोबरच मुलांचा अभ्यास आणि पालक, हसरा रविवार, मुलांनी काढलेल्या चित्रांना प्रोत्साहन, उन्हाळी विज्ञान शिबिर, लहानपण देगा देवा, टी वुईथ अच्युत गोडबोले सर, प्रश्न आपले-उत्तरही आपलेच, पौगंडावस्था समजून घेताना, वाचन कट्टा, एका परिवाराची मुलाखत, तणावमुक्त दहावी असे अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमात मुळे यांना विजया हिरेमठ, श्वेता चितळे, मानसी गोखले, सुनंदा कदम, शाल्मली वझे, डॉ. माधवी ठाणेकर, प्रांजली माळी, अर्चना माळी यांच्यासह इतर सहकाऱ्यांची मदत होत आहे.
व्हॉटस्-अॅप ग्रुपव्दारे मार्गदर्शन
‘संवाद’च्या समुपदेशन कार्यशाळेला उपस्थित पालकांचे व्हॉटस्-अॅपवर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. पालकांना कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास तो यावर विचारला जातो व ग्रुपवरील तज्ज्ञ त्याचे उत्तर देतात. मानसोपचारतज्ज्ञ त्याचे उत्तर देत पालकांच्या शंकेचे समाधान करतात.
वाचनकट्टा उपक्रमही प्रभावी
प्रत्येक वयोगटाच्या मुलांसाठी व पालकांसाठी वाचन कट्टा उपक्रम राबविण्यात येत आहे. सांगली, मिरजेतील सात ठिकाणी दर रविवारी हा उपक्रम होतो. यात वाचनप्रेमी वाचनालयाची मोलाची मदत मिळत आहे. विद्यार्थ्यांची नकारात्मक, संकुचित मानसिकता बदलून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम प्रभावी ठरत आहे.