‘एक प्रभाग एक गणपती’ उपक्रम राबवा
By Admin | Published: July 29, 2016 11:42 PM2016-07-29T23:42:45+5:302016-07-29T23:51:59+5:30
धीरज पाटील : मिरजेत शांतता समिती व मंडळांची बैठक
मिरज : मिरजेत ‘एक प्रभाग एक गणपती’ व ग्रामीण भागात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे, तसेच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी केले. मिरजेत पोलिस ठाण्यात शांतता समिती सदस्य व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करताना पोलिसांना सहकार्याचे आवाहन बैठकीत केले.
धीरज पाटील यांनी डॉल्बी व मोठ्या आवाजाच्या वाद्यांचा वापर करणाऱ्यांवर करवाई करण्यात येणार असल्याचे सांगून, पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याच्या सूचना केल्या. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी, गणेशोत्सव काळात अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविणाऱ्यांची पोलिसांना माहिती द्यावी असे सांगितले.
गजेंद्र कुळ्ळोळी, तानाजी घार्गे, अय्याज नायकवडी, शशिकांत वाघमोडे, माजी आमदार हाफिज धत्तुरे, प्रमोद इनामदार, मनोहर कुरणे, नगरसेवक अतहर नायकवडी, डॉ. प्रशांत लोखंडे, जैलाब शेख, पंडितराव कराडे, सुनील शेडबाळे उपस्थित होते. (वार्ताहर)
सदस्यांकडून सूचनांचा पाऊस
यावेळी शांतता समिती सदस्यांनी, लहान आकाराच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, गणेश मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी, विनापरवाना डिजिटल फलकांना प्रतिबंध करावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, खराब रस्ते दुरूस्त करावेत, गणेश विसर्जन कमी वेळेत व्हावे यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, गणेशोत्सव काळात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी, आदी सूचना केल्या.