सांगलीकरांच्या उत्साहाला आवर बसेना, रस्ते गर्दीने फुललेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:33+5:302021-06-06T04:19:33+5:30
सांगलीतील विविध बाजारपेठांमध्ये सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत अशी गर्दी दिसून येते. नागरिक मास्कही वापरत नाहीत. छाया : सुरेंद्र दुपटे ...
सांगलीतील विविध बाजारपेठांमध्ये सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत अशी गर्दी दिसून येते. नागरिक मास्कही वापरत नाहीत.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सकाळी सात ते अकरा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना प्रशासनाने परवानगी दिली आहे, त्याचा पुरेपूर फायदा सांगलीकर उठवू लागले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील अनेक रस्ते गर्दीने फुलून जात आहेत. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याचे काम लोक करत आहेत.
किराणा, बेकरी व अन्य जीवनावश्यक खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे सर्वत्र गर्दी ओसंडते आहे. मारुती रस्ता, कापड पेठ, हरभट रस्ता, बसस्थानक रस्ता, पंचमुखी मारुती रस्ता, गणपती पेठ आदी परिसरात बारा वाजेपर्यंत गर्दी कायम असते. निर्बंध शिथिल करून पाच दिवस झाले तरीही सांगलीकरांची जीवनावश्यक खरेदी अद्याप संपली नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. मुख्य चौकांत पोलीस तपासणी करत असतानाही त्यांना न जुमानता नागरिकांची भटकंती सुरू असते. यातील अनेकजण मास्कही घालत नाहीत.
मुख्य बाजारपेठेत कपडे, स्टेशनरी, पादत्राणांचे व्यावसायिकही वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. सौेंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थांचे छोटे स्टॉल, टपऱ्या, हातगाडे सर्रास सुरू असतात. एखाद्या सणाच्या खरेदीसारखी गर्दी मारुती रस्ता व हरभट रस्त्यावर दिसून येते.
चौकट
संयुक्त कारवाई गरजेची
महापालिका व पोलिसांनी गर्दीवर नियंत्रणासाठी संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे. जीवनावश्यकच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अन्य दुकानांवर दंडुका उगारायला हवा.