संपूर्ण जिल्हाभर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

By admin | Published: April 22, 2017 12:33 AM2017-04-22T00:33:18+5:302017-04-22T00:33:18+5:30

विश्वास नांगरे-पाटील : अपघात करणाऱ्या नशेबाजांवर आता सदोष मनुष्यवधाचे गुन्हे

The entire district will have CCTV cameras installed | संपूर्ण जिल्हाभर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

संपूर्ण जिल्हाभर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

Next



सांगली : वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा, सामान्य माणूस सुरक्षित राहावा, यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. दारुच्या नशेत अपघात करणाऱ्या नशेबाज वाहनचालकांविरुद्ध यापुढे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यातील सर्व वायरलेस, वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ व ‘पॉस’ यंत्राचे वाटप नांगरे-पाटील यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील टिळक सभागृहात शुक्रवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
नांगरे-पाटील म्हणाले की, कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे. कोल्हापुरात हा प्रयोग केला असून, तो यशस्वीही झाला आहे. याच धर्तीवर अन्य चार जिल्ह्यात ते बसविण्याचे नियोजन सुरु आहे. कोल्हापुरात अडीचशे सीसीटीव्ही कॅमेर बसविले. त्याचा परिणाम चांगला झाला. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणे, प्रवाशांच्या बॅगा लंपास करणे, बँक ग्राहकांना लुटणे, पाकीटमारी या गुन्ह्यांना आळा बसला आहे. गुन्ह्यांना प्रतिबंध व घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी कॅमेऱ्यांची मोठी मदत मिळेल. सांगलीत सध्या केवळ १८ कॅमेरे आहेत. त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. जिल्हा नियोजन समिती, महापालिका, नगरपालिका व लोकसहभागातून कॅमेऱ्यांसाठी निधी जमा केला जाईल. येत्या काही महिन्यात चांगल्या दर्जाचे कॅमेरे जिल्हाभर लावले जातील.
नांगरे-पाटील म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रात दररोज दहा लोकांचा अपघाती मृत्यू होतो. अपघातात बळी जाणाऱ्याच्या कुटुंबाची वाताहत होते. अपघात करणारा दुसऱ्यादिवशी जामिनावर बाहेर येतो. यासाठी आता जिल्ह्यातील सर्व पोलिसांना ‘बे्रथ अ‍ॅनालायझर’ यंत्राचे वाटप केले. या यंत्राच्या मदतीने नशेबाज वाहनचालकांची तपासणी करणे सोपे होणार आहे. अपघात करुन बळी घेणाऱ्या वाहनचालकांच्या रक्ताचे नमुने तपासले जातील. मोठ्या प्रमाणात दारूचे अथवा अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
मला ओव्हरटेक करून पुढे...
नांगरे-पाटील म्हणाले की, चार दिवसांपूर्वी मी कोडोली (ता. पन्हाळा) येथून कोल्हापूरला येत होतो. त्यावेळी पंधरा ते सोळा वयोगटातील तीन तरुण दुचाकीवरुन ‘ट्रीपलसीट’ बसून निघाले होते. ते माझ्या मोटारीला ओव्हरटेक करून पुढे गेले. माझ्या ताफ्यातील पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. मी या तरुणांकडे, तुम्ही ‘ट्रीपलसीट’ बसून कुठे निघाला आहात?’, अशी विचारणा केली. त्यावर या तरुणांनी, आम्हाला निर्भया पथकाने पकडले होते व समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यात बोलाविले आहे, असे सांगितले. या तरुणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. दुचाकीची कागदपत्रेही नव्हती. नंबरप्लेटही नव्हती. शेवटी या तरुणांच्या पालकांना मी स्वत: कार्यालयात बोलावून ताकीद दिली. तसेच त्यांच्यावर कारवाईही केली.

Web Title: The entire district will have CCTV cameras installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.