संपूर्ण जत तालुका सिंचनाखाली आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:53+5:302021-04-25T04:25:53+5:30
शेगाव : जत तालुक्यातील संपूर्ण शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आणणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील ...
शेगाव : जत तालुक्यातील संपूर्ण शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आणणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
तालुक्यातील सनमडी व डफळापूर येथे बंदिस्त पाइपलाइनद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन खासदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बिळूर कालवा क्रमांक २ च्या डफळापूर लघु वितरका क्रमांक १ मधून बंदिस्त नलिकेद्वारे डफळापूर व कुडनूर हद्दीतील ३५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचप्रमाणे म्हैसाळ प्रकल्प जत कालव्याद्वारे कुनीकोनूर वितरिका बंदिस्त पाइपलाइनमधून सनमडी, कुणिकोनूर, खैराव या गावांतील ८२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या दोन्ही पाणी योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार विक्रम सावंत, माजी सभापती संजय सावंत, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, नाना शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, परशुराम चव्हाण, म्हैसाळ योजनेचे अभिमन्यू मासाळ, सी. एस. मिरजकर, एम. बी. कर्नाळे, समाधान शिंदे, मोहन भोसले, तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, पंतप्रधान सिंचन योजनेतून म्हैसाळ योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. तालुकावासीयांनी मला भरभरून प्रेम दिले असून, त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.
फोटो : २४ शेगाव १
ओळी : जत तालुक्यातील डफळापूर येथे बंदिस्त पाइपलाइनद्वारे म्हैसाळ योजनेचे पाणी सोडताना खासदार संजयकाका पाटील, आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.