मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:56+5:302021-05-15T04:24:56+5:30
संख : राज्य शासनाने मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. केंद्र सरकारने ...
संख : राज्य शासनाने मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. केंद्र सरकारने विशेष घटनादुरुस्तीच्या माध्यमातून राज्यघटनेत नवे ३४२(अ) कलम आणले. राज्य शासनाने मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी हे मराठा समाजाला पुन्हा एकदा फसवणुकीकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत. या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व मिळाले तरी घटनाबाह्य असल्याने टिकणार नाही.
एसईबीसी हा नवीन प्रवर्ग निर्माण केला आहे.
तांत्रिक व कायदेशीर अंगाने विचार केला तर कलम ३४० अंतर्गत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यात व ३४२(अ) यामध्ये फरक दिसून येत नाही. त्यामुळे याचा राज्य शासनाने गांंभीर्याने विचार करून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुधीर नाईक, तालुका उपाध्यक्ष रोहित चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे, जत शहराध्यक्ष प्रमोद काटे, तालुका सचिव बजिरंग शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.