खानापूरचे प्रवेशद्वार अन् बुरूज नष्ट होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:46+5:302020-12-22T04:26:46+5:30
खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे ...
खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे (वेस) काम पूर्ण झाले. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खानापूर येथील तटबंदीची व बुरूजांची आतापर्यंत पूर्ण पडझड झाली आहे. सध्या केवळ मुख्य प्रवेशद्वार व त्याचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला मातीचा बुरूज अस्तित्वात आहे.
ऐतिहासिक प्रवेशद्वार व बुरूजही शेवटची घटका मोजत आहे. गेली नऊशे वर्षे ऊन, पाऊस, वारा यांचा मारा सोसत उभ्या असलेल्या या ऐतिहासिक बांधकामाच्या देखभालीची व दुरूस्तीची आवश्यकता आहे. मात्र संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे.
प्रवेशद्वाराचे छत खराब झाले आहे. पावसाळ्यात पाणी पाझरत आहे. प्रवेशद्वारातून जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढत गेल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नाहीत. मातीचा बुरूज ठिकठिकाणी ढासळू लागला आहे.
चाैकट
नगरपंचायतीने लक्ष द्यावे
खानापूर गावाचा समावेश केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. यामुळे दुरूस्ती करण्यात अडचणी येत आहेत, असे समजते. मात्र खानापूर नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
फोटो-२१खानापूर१.२