coronavirus: तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन नसल्याने उद्योग, व्यापाराला दिलासा; मालाची आवक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:25 PM2022-02-09T18:25:50+5:302022-02-09T18:39:26+5:30
लाॅकडाऊनची शक्यता आता पूर्णपणे मावळली असल्याने उद्योजक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला
सांगली : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवेळी लॉकडाऊनमुळे बसलेल्या मोठ्या आर्थिक फटक्यातून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची चिंता व्यापारी, उद्योजकांना सतावत होती. मात्र, लॉकडाऊनशिवाय उपाययोजना झाल्याने व लाट आता ओसरत असल्याने व्यापार-उदीम चांगली होत आहे. याबाबत उद्योजक, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांनी मालाची आवक कमी केली होती. लॉकडाऊन लागला तर उत्पादित मालाचा प्रश्न निर्माण होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे नाेव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत मालाची आवक कमी होती.
मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढून देखील लॉकडाऊन न लावता स्थानिक प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर केला. सध्या ही लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. लाॅकडाऊनची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी केलेली मालाची आवक आता वाढविली आहे. एकूणच दोन्ही क्षेत्रांतील वातावर पूर्ववत होऊ लागले आहे. उत्पादनाची गतीही वाढली आहे.