डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 12:24 AM2016-02-11T00:24:24+5:302016-02-11T00:32:25+5:30

शेततळ्यातून मोफत पाणी : वाळेखिंडीत हिंगमिरे, जमादार यांचा उपक्रम

Entrepreneurs have come for pomegranate gardens | डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

Next

भागवत काटकर- शेगाव--दुष्काळाच्या तीव्रतेत दिसेंदिवस वाढ होत आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी जिवापाड जपल्या आहेत. वाळेखिंडी (ता. जत) येथे पाण्याची पातळी ८०० ते १००० फुटांपर्यंत गेली आहे. डाळिंब बागा जगविण्यासाठी बोेअरवेल खोदूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपुढे डाळिंब बागा जगविण्याचे आव्हान होते. गावाच्या दक्षिणेला उद्योजक महादेव हिंगमिरे व इकबाल जमादार यांनी मोठे शेततळे खोदले आहे. या तलावातील पाणी त्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी सर्वांना खुले करून मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे वाळेखिंडीतील डाळिंब बागांना जीवदान मिळणार आहे. उद्योजक हिंगमिरे व जमादार यंच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणारे डाळिंब क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने डाळिंब बागा वाचावयाच्या कशा? या काळजीत येथील शेतकरी होते. हिंगमिरे व जमादार यांनी शेतकऱ्यांना शेतातील शेततलाव खुले केले आहे. सर्वत्र शेतकऱ्यांना या तलावातून पाणी बागांना देण्यासाठी उपलब्ध केले आहे. या तलावातून पाण्याचे काही छोटे टॅँकरही लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होत आहेत. रोज सुमारे १ लाख लिटर पाणी बागा व पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. परिसरातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत आहे. बागा वाचविण्यासाठी १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या कोसारी येथील तलावातून शेतकऱ्यांना पाणी आणावे लागत होते. आता हे अंतर तर वाचलेच आहे. शिवाय खर्चात बचतही झाली आहे.


पाणी काटकसरीने वापरा
महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यरत नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. शेततलावात पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी डाळिंब बागा वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध व्हावे, ही तळमळ आहे. बोअरवेलला जादा ताण न देता शिल्लक राहिलेले थोडे थोडे पाणी एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यांना दिले, तरच डाळिंब बागा व पशुधन वाचेल. शेतकऱ्यांनीही एकमेकांना सहकार्य केले, तरच शेती व शेतकरी उद्ध्वस्त न होता टिकेल. सहा महिने पावसाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे, असे मत उद्योजक, महादेव हिंगमिरे, इकबाल जमादार यांनी व्यक्त केले.

Web Title: Entrepreneurs have come for pomegranate gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.