चौदाशे किमी सायकल प्रवासात आष्ट्यातील युवकांचा पर्यावरण जागर, भिलवडी-आष्टा-कन्याकुमारी चौदा जणांची शांतता रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:39 PM2024-11-28T16:39:04+5:302024-11-28T16:39:43+5:30
वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टा (ता.वाळवा) येथील युवकांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. सुमारे १४ युवक १४०० किलोमीटर सायकलवरून प्रवास करीत शांतता, व्यसनमुक्ती तसेच बेटी पढाओ बेटी बचाओ तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देत आहेत.
आष्टा शहरातील अनेक युवक सायकलींवरून नियमितपणे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर व्यायाम करतात. या सायकलप्रेमी युवकांपैकी अमोल पाटील, अमोल चौगुले, प्रकाश उर्फ छोटू लिगाडे, परशुराम मदने, लक्ष्मण माळी, सचिन चौगुले, शुभम सरडे, संदीप खोत (मिरजवाडी), सुबोध वाळवेकर, बाहुबली चौगुले (भिलवडी), सुहास सूर्यवंशी (पलूस), महावीर वसगडेकर (मिरज), जितेंद्र शेट्टी (अंकली), दीपक पाटील, सुहास सूर्यवंशी यांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास करण्याचे निश्चित केले. त्यांना उद्योगपती गिरीश चितळे, राजू चौगुले, अमोल पाटील, डॉ. अरुण सरडे, निनाद माळी यांचे सहकार्य लाभले.
आष्टा येथील अंबाबाई मंदिरानजीक सांगली जिल्हा नशाबंदी मंडळाचे संघटक समीर गायकवाड, डॉ. अरुण सरडे, शंकर मोहिते, रवींद्र चौगुले, निनाद माळी, प्रदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पहिल्या दिवशी सुमारे १५५ किमी व दुसऱ्या दिवशी १४५ किमी प्रवास केला. हे युवक कन्याकुमारीपर्यंत चौदाशे किलोमीटर प्रवास करणार आहेत. या प्रवासात सामाजिक शांततेचा संदेश देण्याबरोबर बेटी पढाओ, बेटी बचाओ, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सायकलप्रेमी युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे.
वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास
डॉ अरुण सरडे यांनी वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास सुरू ठेवला असून, त्यांनी नुकताच सप्टेंबरमध्ये जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आदर्श घालून दिला आहे.