वाळवा-शिराळ्यात रंगली आघाडी बिघाडीची समीकरणे
By Admin | Published: October 17, 2016 12:40 AM2016-10-17T00:40:19+5:302016-10-17T00:40:19+5:30
राजकारणाचे बदलते रंग : पैरा फेडाफेडीत नेते आणि पक्षांची झाली वाताहत; नव्या खेळींसह अनेकजण मैदानात
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आणि स्वाभिमानी आदी पक्षांचे नेते स्थानिक पातळीपासून ते लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका बजावतात. तेव्हा स्वपक्षाचा विचार सोडून देतात. कधी आघाडी, तर कधी बिघाडीमुळे काही नेत्यांची आणि पर्यायाने त्यांच्या पक्षांची वाताहात झाली आहे.
वाळवा, शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक हे मातब्बर नेते मानले जातात. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले अण्णासाहेब डांगे यांना पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्ष पदापलीकडे काही मिळाले नाही, तर त्यांचे चिरंजीव अॅड. चिमण डांगे यांना इस्लामपूर नगराध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीतील भाऊगर्दीमुळे तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सध्या तरी डाळ शिजत नाही. त्यामुळे हे कार्यकर्ते आघाडी-बिघाडीत आपला हात धुऊन घेतात.
जयंत पाटील यांच्या विरोधातील नेते हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची कास धरलेली नाही. त्यांच्याकडून नेहमीच बदलत्या राजकीय नीतीचा वापर झाला. त्यामुळे नायकवडी यांच्या जिवाभावाचे कार्यकर्तेही दुरावले जावू लागले आहेत. परिणामी त्यांना हुतात्मा संकुलापलीकडे आपल्या राजकीय सीमा ओलांडून जाता आलेले नाही.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादकांची ताकद आणि राष्ट्रवादी विरोधातील सर्वच नेते यांनी एकत्र येऊन बांधलेली मोट म्हणजेच आघाडी. याच ताकदीवर राजू शेट्टी यांनी लोकसभेचा गड अबाधित ठेवला आहे. हा गड जिंकून ते भाजपच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या अडचणींचा तीर करून साखरसम्राटांनी भाजपला टार्गेट करण्याचा डाव आखल्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांची ताकद कमी होत चालली आहे.
वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवाजीराव नाईक यांच्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच चढ-उतार आले. मानसिंगराव नाईक आणि माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख हे आपापल्या पक्षाशी निष्ठा राखून आहेत. वरिष्ठ पातळीवर दोन्ही काँग्रेसच्या आघाडी-बिघाडीच्या राजकारणात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना फटका बसला आहे. वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या रुपाने इस्लामपूर, आष्टा आणि ग्रामीण भागातील सत्ता केंद्रांवर राष्ट्रवादी चांगलीच स्थिरावली आहे.
एकेकाळी काँग्रेसच्या झेंड्याखाली दोन शिवाजीराव कार्यरत होते. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता होती. तेव्हापासून जयंत पाटील (वाघ) आणि आमदार शिवाजीराव नाईक (नाग) यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे राजकारण सुरू झाले. ते आजही कायम आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडी स्थापन केली.
गत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यातील काहींना काहीअंशी यश मिळाले, तर काही नेत्यांना या आघाडीचा फटकाही बसला. त्यानंतर मोदी लाट आली. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीचे घर गाठले, तर शिवाजीराव नाईक यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. परंतु भाजपची बिजे शिराळा मतदार संघात आजही रुजलेली दिसत नाहीत. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी हातात हात घालून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याविरोधात असणारे नानासाहेब महाडीक, वैभव नायकवडी, सी. बी. पाटील यांच्या सहकार्याने वाळवा तालुक्यातील ४८ गावात शिवाजीराव नाईक गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कार्यक्रम..!
सांगली जिल्ह्यात आघाडी, बिघाडी, फोडाफोडी यामध्ये माहीर असलेल्या आमदार जयंत पाटील यांनी मनात आणले तर कोणाचा कार्यक्रम करतील याचे राजकीय गणित कोणालाच समजलेले नाही. ज्यांनी ज्यांनी राजकीय गणित सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी त्यांचा कार्यक्रम केला आहे. परंतु माजी आमदार विलासराव शिंदे, भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा कार्यक्रम करण्यात जयंत पाटील आजही अयशस्वी राहिले आहेत.