कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांवरील उपचारास यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:17+5:302021-05-26T04:28:17+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कायम असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या बाधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कायम असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या बाधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या लाटेचीही तयारी करण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना असणारा धोका लक्षात घेऊन बाधित होणाऱ्या लहान मुलांवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
जिल्ह्यात डेडिकेटेड पीडीयाट्रीक कोविड रुग्णालय, बाालरुग्णांसाठी कोविड केअर सेंटरचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, मिरज कोविड रुग्णालय, मिशन रुग्णालय व भारती रुग्णालयात तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन किती बेड राखीव ठेवता येतील, याचे नियोजन करावे. त्यासाठी लागणारी औषधे, साहित्यांची खरेदी करून ठेवावी. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या टेलिमेडीसीन कक्षाशी जिल्ह्यातील यंत्रणेचा समन्वय प्रस्तापित करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह टास्क फोर्स सदस्य उपस्थित होते.
चौकट
लवकर निदान आवश्यक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आरोग्य यंत्रणांनी आतापासूनच लहान मुलांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधे व इतर साधनांची खरेदी करून ठेवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.