लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून तलाठ्याची सांगलीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:30 PM2019-04-01T13:30:12+5:302019-04-01T13:32:15+5:30
एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सांगली : एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जोशी यांनी सांगलीत तलाठी कार्यालयात सेवा बजावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी काम केले होते. चार महिन्यापूर्वी त्यांची एरंडोली येथे बदली झाली होती. आईसोबत ते वारणालीत राहत होते. शनिवारी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते.
सायंकाळी घरी परत आले. त्यानंतर कामानिमित्त ते बाहेर गेले. रात्री पुन्हा घरी आले. जेवण करून घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यास गेले. सकाळी त्यांची आई फिरायला गेली होती. त्या आठ वाजता घरी परत परतल्या.
मुलगा झोपेतून अजून का उठला नाही, हे पाहण्यासाठी त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी जोशी गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर संजयनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. जोशी यांनी मध्यरात्री छताच्या हुकाला दोरीने गळफास घेतला असण्याची शक्यता आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आधार हरपला
जोशी यांच्या वडिलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर आता मुलाने आत्महत्या केल्याने त्यांच्या आईचा आधारच हरपला आहे. जोशी यांचे लग्न ठरत नव्हते. ते ठरविण्यासाठी त्यांची खटपट सुरू होती. यातून ते नाराज होते. कदाचित आत्महत्या करण्यामागे हेच कारण असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.