मिरज ‘सिव्हिल’मधून कोरोना पॉझिटिव्ह दरोडेखोराचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:06 AM2021-01-05T06:06:04+5:302021-01-05T06:06:22+5:30
crime news: बाथरूममध्ये नळ सुरू ठेवून खिडकीतून पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून साेमवारी कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी पळून गेला. दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्याला अटक केली हाेती. केरामसिंह रमेश मेहडा (वय २५, रा. धार, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. रुग्णालयातील बाथरूममधून आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली.
अट्टल गुन्हेगार मेहडा याच्याविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यास कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यास दोन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मेहडा बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये नळ सुरूच ठेवून तो खिडकीतून पसार झाला. मेहडा बराच वेळ बाहेर आला नसल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता, तो खिडकीतून पळून गेल्याचे निदर्शनास आले.
कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गांधी चाैक पोलिसांत मेहडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित आरोपी पोलीस व सिव्हिल प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने संबंधितांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.