कुपवाड एमआयडीसीत ईएसआयचे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर, कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला अखेर यश
By श्रीनिवास नागे | Published: March 2, 2023 05:45 PM2023-03-02T17:45:50+5:302023-03-02T17:46:37+5:30
राज्य कामगार विमा योजनेने विमाधारकांची पाच वर्षांतील वाढ विचारात घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये १००० चौरस मीटरच्या जागेवर ५० खाटांचे रुग्णालय उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे
कुपवाड (सांगली) : कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआय) रुग्णालय उभारणीसाठी राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी नुकतीच मान्यता दिली. यामुळे ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सलग तीन वर्षाच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, संचालक रमेश आरवाडे यांनी दिली.
मालू म्हणाले की, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्यासाठी भूखंड मिळण्याकरिता शासकीय पातळीवर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य कामगार विमा योजना यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीशीही संपर्क साधला होता.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी लक्ष घालून मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला. परिणामी मुंबई कार्यालयाने याची दखल घेतली. कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने या सर्व पत्रव्यवहाराचा पाठपुरावा संचालक रमेश आरवाडे यांनी केला. राज्य कामगार विमा योजनेने विमाधारकांची पाच वर्षांतील वाढ विचारात घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये १००० चौरस मीटरच्या जागेवर ५० खाटांचे रुग्णालय उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव यांचे सहकार्य मिळाले. लवकरच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर भूखंड दिला जाईल व गतीने रुग्णालय उभारणी केली जाईल.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक हरिभाऊ गुरव, दीपक मर्दा, रतिलाल पटेल, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील, दिनेश पटेल, व्यवस्थापक अमोल पाटील उपस्थित होते.