कडेगावात अत्यावश्यक सेवा दुपारपर्यंत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:24 AM2021-04-19T04:24:51+5:302021-04-19T04:24:51+5:30
नगरपंचायत कार्यालयात प्रशासन, व्यापारी, भाजी विक्रेते, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन यांची बैठक झाली. यानंतर उपनगराध्यक्ष दिनकर जाधव यांनी ...
नगरपंचायत कार्यालयात प्रशासन, व्यापारी, भाजी विक्रेते, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन यांची बैठक झाली. यानंतर उपनगराध्यक्ष दिनकर जाधव यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली.
ते म्हणाले, कडेगाव शहरातील रुग्णसंख्या दोनशेवर पोहोचली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील अत्यावश्यक सेवेतील सर्व जीवनावश्यक वस्तू विक्री दुकाने सोमवार १९ एप्रिलपासून सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. भाजीपाला विक्रेत्यांना स्वतःच्या जागेत भाजीपाला विक्री करण्यास तसेच शहरात फिरून विक्री करण्यास सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत परवानगी असेल. परंतु सुरेशबाबा देशमुख चौकातील भाजी मंडई पूर्णपणे बंद राहील.
हॉटेल व्यावसायिकांना सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत पार्सल सेवा पुरविण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करणे तसेच ४५ वर्षे पूर्ण असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लस घेणे बंधनकारक राहणार आहे. ही कार्यवाही न झाल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसेच विनामास्क व विनाकारण घराबाहेर फिरणारे नागरिक, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष दिनकर जाधव यांनी सांगितले.