सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:55 PM2018-09-20T13:55:04+5:302018-09-20T13:56:45+5:30

सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

Establish Rural Development Development Organization for the development of Sangli: Subhash Deshmukh | सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख

सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख

Next
ठळक मुद्देप्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमाचा घेतला आढावा 2018-19 : पर्यटनस्थळ विकासासाठी 3 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद

सांगली : सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा. या माध्यमातून पर्यटन, धार्मिक स्थळांचा विकास, हळद, बेदाणा, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांचे ब्रँडिंग होईल. तसेच रोजगार निर्मितीही होईल. शासनाला लोकसहभागाची साथ मिळेल. गावांचे आर्थिक, सामाजिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित प्रादेशिक पर्यटन विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यात क वर्ग मान्यताप्राप्त 50 पर्यटनस्थळे आहेत. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 8 वन पर्यटन स्थळांना 1 कोटी 10 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. तसेच वन पर्यटन वगळून इतर पर्यटन स्थळांसाठी 2 कोटी 25 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही कामे दर्जेदार करावीत. तसेच, पर्यटनस्थळांच्या परिसरात पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांची मुंबईमध्ये लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून, तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील.

चांदोली येथे पर्यटकांसाठी चांगली निवास व्यवस्था, बोटींग सुविधा, अंतर्गत रस्ते, सर्प उद्यान, मत्स्यालय होण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, औदुंबर येथे कृष्णा नदीत मगरीच्या वावराच्या पार्श्वभूमिवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रणा करावी किंवा कुंपण घालण्याची कार्यवाही आगामी दोन ते तीन महिन्यात पूर्ण करावी. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वॉटर ए. टी. एम. बसवताना प्रमाणित निकष करून घेऊन, पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या. तसेच, पेड प्रादेशिक पर्यटन केंद्र ठिकाणी रस्ते बांधकाम करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. यावेळी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Establish Rural Development Development Organization for the development of Sangli: Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.