राज्यस्तरीय महामार्ग, प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना, पुण्यातील बैठकीत निर्णय
By संतोष भिसे | Published: November 20, 2023 03:38 PM2023-11-20T15:38:35+5:302023-11-20T15:39:34+5:30
सांगली : राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष ...
सांगली : राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष आणि पाठपुरावा सुरु आहे. या सर्व बाधित शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनांची एकच संयुक्त राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. १९) झालेल्या व्यापक बैठकीत संयुक्त समितीची घोषणा करण्यात आली. यावेळी शरद पवार, प्रल्हाद गायकवाड, डॉ. ओमन पाटील, विश्वास साखरे, नितीन साळुंखे, विनय कुंभार, प्रसाद घोनंद, प्रकाश केमसे, योगेश मांगले, राजाभाऊ गाढे, दिगंबर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. आंदोलनाला नेमकी दिशा मिळावी आणि राज्यस्तरावर शेतकऱ्यांसाठी एकसारखे शासकीय निर्णय व्हावेत यासाठी संयुक्त समितीचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी घेतल्या आहेत. त्यांचे वेगवेगळे मूल्यांकन केले जात आहे. मूल्यांकनासाठी वेगवेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या कामात जमिनींना मिळालेला भाव अन्य महामार्गांसाठी दिला जात नाही. याविरोधात शेतकरी संघर्ष समित्या ठिकठिकाणी लढा देत आहेत. हा लढा एकमुखी होण्यासाठी सर्व समित्या एकाच झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. त्यातूनच महामार्ग व प्रकल्प बाधीत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पुण्यातील बैठकीत महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा झाली. बाधीत क्षेत्राचे योग्य मूल्यांकन, वास्तववादी किंमत, प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये मोबदला, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढण्याचे ठरले.
यावेळी संतोष लोखंडे, गुलाबराव चौधरी, गोविंद घाटोड, मारोती मुंढे, धोंडीराम लांबाडे, सुरेश मानमोडे, विलास गावंडे, प्रशांत मानधने, संतोष दहातरे, जगदीश दहातरे, रमेश गावंडे, शिवाजी इंगळे, अनिल शिंदे, दिगंबर मोरबाळे, गणपती येसणे यांच्या राज्य समन्वयक समिती सदस्यपदी निवडी झाल्या.
सध्या सुरु असणारे प्रकल्प
राज्यात सध्या पुणे बंगळुरु हरित महामार्ग, सूरत - चेन्नई हरित महामार्ग, नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग, संकेश्वर - बांदा महामार्ग, पुणे वळण मार्ग, अकोला - नांदेड महामार्ग, पुणे- नाशिक लोहमार्ग, पुणे -नाशिक महामार्ग, मुंबई- नागपूर समृध्दी महामार्ग, पुणे - मिरज लोहमार्ग, गुहागर - विजापूर महामार्ग आदी कामे सुरु आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.
राज्य संघटनेच्या निवडी
राज्यव्यापी संघर्ष समितीचे निमंत्रक म्हणून दिगंबर कांबळे, प्रा. दिनकर दळवी, राजन क्षीरसागर, बाळासाहेब मोरे, राजाभाऊ चोरगे, नारायण विभुते, शिवाजी गुरव यांच्या निवडी झाल्या.