शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:57+5:302021-02-23T04:39:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संभाजीराव भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमधील फुटीवर अखेर रविवारी शिक्कामोर्तब झाले. शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आलेले कार्यवाह ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संभाजीराव भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमधील फुटीवर अखेर रविवारी शिक्कामोर्तब झाले. शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आलेले कार्यवाह नितीन चौगुले यांनी मेळावा घेत ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान’ या नव्या संघटनेची घोषणा केली. राजकारणविरहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच या संघटनेकडूनही राज्यभर काम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले होते. शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी याबाबतची माहिती दिली होती. तेव्हापासून चौगुले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरातील माधवनगर रोडवर असलेल्या डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात चौगुले यांनी आपली भूमिका मांडत नव्या संघटनेची घोषणा केली.
चौगुले म्हणाले की, संभाजीराव भिडे यांच्या आदेशानुसार वीस वर्षांपासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आलो आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता भिडे यांनी दिलेले कार्य करत आलो. या कालावधीत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानचे काम वाढविले. २०१३ पासून पूर्णवेळ काम करताना गडकोट मोहिमेसह सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविले. भिडे यांनीही पूर्ण विश्वास व्यक्त केल्याने चांगले काम करू शकलो. मात्र, संघटनेतीलच काहीजणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप सुरू केले. माझी बदनामी सुरूच ठेवताना त्यांनी शिवप्रतिष्ठानमधून निलंबन केले. संघटनेतून निलंबन केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून निलंबित कोणीही करू शकत नाही.
पाच-सात वर्षांपूर्वी शिवप्रतिष्ठानपासून दूर झालेले अचानक स्वत:च्या फायद्यासाठी पुन्हा सक्रिय झाले त्यावेळी भिडे यांना यांच्या हेतूबद्दल कल्पना दिली होती. याच चौकडींनी आपली बदनामी केली असली तरी यापुढेही शिवप्रतिष्ठानचे उपक्रम तितक्याच ताकदीने राबविले जातील.
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही राजकारणविरहित संघटना असेल. संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात संघटना काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राम यादव, मुकुंद मासाळ, राकेश नलवडे, विजय गुळवे, समीर गुजर, लक्ष्मणराव मंडले, मोहन शिंदे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत मैगुरे, वैभव कोर, अरुण शिंदे यांच्यासह राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
भिडे यांच्याबद्दल आदर कायम
चौगुले म्हणाले, शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले असले तरी संभाजीराव भिडे यांच्याविषयी आदर कायम असणार आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच नवीन संघटनेचे काम असणार आहे. राजकारणविरहित कामास प्राधान्य देणार आहे.