ईटीएस मशिनमुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येणार :अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 PM2021-06-16T16:38:28+5:302021-06-16T16:39:39+5:30
collector Sangli : जमिनीच्या मोजणीची तसेच वेगवेगळ्या सर्वेक्षणासाठी करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी ईटीएस मशिन महत्वपूर्ण कामगिरी बजावेल. त्यामुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येईल. तसेच भूमि अभिलेख विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
सांगली : जमिनीच्या मोजणीची तसेच वेगवेगळ्या सर्वेक्षणासाठी करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी ईटीएस मशिन महत्वपूर्ण कामगिरी बजावेल. त्यामुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येईल. तसेच भूमि अभिलेख विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयास 6 ईटीएस मशिन प्रदान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, तहसिलदार (महसूल) शरद घाडगे, प्रभारी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख रोहिणी सागरे, उपअधिक्षक भूमि अभिलेख ज्योती पाटील, वर्षा सुर्यवंशी, अशोक चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मोजणीच्या कामामध्ये गतीमानता यावी, जिल्ह्यातील जनतेची प्रलंबित मोजणीची कामे तातडीने व्हावीत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2020-21 मधील नाविण्यपूर्ण योजनेतून तालुकास्तरीय कार्यालयांना 6 ईटीएस मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनव्दारे प्रलंबित भूसंपादन मोजणी प्रकरणांचा तातडीने निपटारा करता येणे शक्य आहे.
इस्लामपूर, तासगाव, पलूस, खानापूर, विटा व वाळवा कार्यालयांसाठी प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशिन्स अद्ययावत तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या आहेत. या मशिनचा वापर नियमित भूमापन, भूसंपादन प्रकरणे, गौण खनिज मोजणी प्रकरणे, गावठाणातील मिळकतींची मोजणी व इतर मोजणी प्रकरणे अचुकतेने व वेळेत पूर्ण करण्याकामी होत असल्याचे त्यांनी सांगितले.