Sangli- पूरग्रस्तांच्या व्यथा: कृष्णामाई येते, प्रशासन इशारा देते, घरापासून दूर नेते..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:33 PM2024-07-27T18:33:45+5:302024-07-27T18:34:57+5:30

कर्नाळ रस्त्यावरील पूरग्रस्त महापालिकेच्या शाळांत आश्रयाला

Evacuation of flood affected citizens of Sangli district has started | Sangli- पूरग्रस्तांच्या व्यथा: कृष्णामाई येते, प्रशासन इशारा देते, घरापासून दूर नेते..

छाया-नंदकिशोर वाघमारे

हणमंत पाटील/संतोष भिसे

सांगली : कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढेल तसा विस्तारित भागाला पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कर्नाळ रस्त्यावरील पुराच्या भीतीने धास्तावलेल्या कुटुंबांनी घरे रिकामी करून महापालिकेच्या शाळांत आश्रय घेतला होता.

सांगलीत आजवर तीनवेळा महापुराचे फटका सोसलेल्या नागरिकांनी यंदा लवकरच घराबाहेर पडायला सुरुवात केली. सांगलीत गुरुवारी कृष्णा नदीची पाणीपातळी ३५ फुटांवर जाऊ लागताच लोक घराबाहेर पडू लागले. गुरुवारी दुपारी कर्नाळ रस्त्यावर पाणी आले. रस्ता पूर्ण बंद होण्यापूर्वीच तेथील रहिवाशांनी शहरात धाव घेतली. काकानगर, दत्तनगरमधील लोकही मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले आहेत.

येथून सुरू आहे स्थलांतर

कर्नाळ रस्त्यावरील काकानगर, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, शिवशंभो चौक, शिव मंदिर परिसर, पटवर्धन प्लॉट, जामवाडी, मगरमछ कॉलनी, इदगाह मैदान, सांगलीवाडीत गावडे मळा, कदमवाडी, स्मशानभूमी, शामरावनगर येथील रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. राहण्या-खाण्याचे साहित्य, जनावरे आणि आठवडाभराच्या कपड्यांसह रहिवासी घराबाहेर पडत आहेत.

महापालिकेकडून राहण्या-खाण्याची सोय

महापालिकेने शाळांमध्ये पूरग्रस्तांची राहण्याची सोय केली आहे. पंचशीलनगर शाळा, हिराबाग कॉर्नर येथील दोन शाळा, सह्याद्रीनगरमध्ये शाळा क्रमांक २३ येथे पूरग्रस्त राहत आहेत. महापालिकेने त्यांच्या जेवणाचीही सोय केली आहे. घराबाहेर पडणाऱ्या पूरग्रस्तांसाठी काही स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहनांची सोय करून दिली. जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था मात्र पूरग्रस्तांनाच करावी लागत आहे.

शुक्रवारी सायंकाळी ३९ फूट पातळी

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फुटांपर्यंत स्थिर होती. दिवसभर पावसाने ओढ दिल्याने पातळीत विशेष वाढ झाली नाही.

महापालिकेची सज्जता

महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष तथा वॉररुम सज्ज करण्यात आला आहे. मदत व बचावकार्य कक्षात अग्निशमन दलाचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या निवारा केंद्रांत आश्रय घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

वाळवा तालुक्यातही स्थलांतर वेगाने

वाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठच्या कुटुंबांनी पशुधनासह सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. ऐतवडे खुर्द (पर्वतवाडी) येथील ४० कुटुंबांतील १५६ ग्रामस्थ व १३६ जनावरे सुरक्षितस्थळी गेली. चिकुर्डेमध्ये भोसले वस्तीवरील ४५ कुटुंबातील १५१ ग्रामस्थ व ३४५ जनावरे स्थलांतरित झाली. कणेगावमध्ये १८५ कुटुंबांतील ९०५ रहिवासी व ४९८ पशुधन सुरक्षितस्थळ नेण्यात आली. भरतवाडीमध्ये ३५ कुटुंबातील १७५ ग्रामस्थ व १०८ जनावरांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे.

Web Title: Evacuation of flood affected citizens of Sangli district has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.