सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु, आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर
By अविनाश कोळी | Published: July 24, 2024 03:45 PM2024-07-24T15:45:34+5:302024-07-24T15:46:02+5:30
पुनर्वसन केंद्रांची सज्ज्जता
सांगली : आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झाले. येथील आठ घरांना पाण्याने वेढले. त्यामुळे महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील सर्व नागरिकांसह इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पूरपट्ट्यात स्थलांतराची लगबग
सांगलीच्या पूरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्त्यावरील काही नागरिकांनी साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासून या भागात स्थलांतरासाठीची पूर्वतयारी सुरु होती.
आयुक्तांकडून मिरजेत पाहणी
महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी बुधवारी मिरजेच्या कृष्णा घाट परिसरास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. कृष्णा नदी क्षेत्रात आणि कोयना धरण क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठाच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
मिरजेची पाणीपातळी ४३ फुटांवर
मिरजेत दुपारी दोन वाजता कृष्णेची पाणीपातळी ४३.१ फूट होती. ४५ फूट ही इशारा पातळी आहे. कृष्णा घाट परिसरात नागरिकांनी आपली जनावरे आणि अत्यावश्यक साहित्यासह स्थलांतर व्हावे. प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. मिरज हायस्कूल येथे निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त सजीव ओहोळ, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, अग्निशमन अधिकारी सुनील माळी उपस्थित होते.