पन्नास कोटी खर्चूनही सांगली पुन्हा खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:33 PM2019-11-02T16:33:57+5:302019-11-02T16:34:30+5:30
आधी महापूर आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच ५० कोटी रुपये खर्च करून चकचकीत केलेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.
सांगली : आधी महापूर आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच ५० कोटी रुपये खर्च करून चकचकीत केलेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.
वर्षभरापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांनी ३३ कोटी, तर महापालिकेने २४ कोटींचा निधी रस्ते गटारी व इतर सुविधांवर खर्च केला.
याशिवाय नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधी व महापालिका अर्थसंकल्पातील जनरल फंडातूनही रस्त्यांवर लाखो रुपये खर्च झाले. पण आॅगस्ट महिन्यात महापुरामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले.
महापूर ओसरल्यानंतर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अगदी दिवाळीतही पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे अंतर्गत रस्तेच नव्हे तर, नव्याने केलेले चकचकीत रस्तेही खड्ड्यात गेले.
आझाद चौक ते राजवाडा चौक या स्टेशन रोडमार्गे जाणाऱ्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी पॅचवर्क केले; मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने पॅचवर्कही धुऊन गेले.
राममंदिर- सिव्हिल हॉस्पिटल या रस्त्याची गेल्या सहा महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली आहे. बसस्थानक ते आंबेडकर रोड या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. मुख्य बसस्थानक, झुलेलाल चौकात खड्डेच खड्डे आहेत. पटेल चौक ते कॉलेज कॉर्नर या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आमराईसमोर रस्त्याची चाळण झाली होती.