सीएमपी प्रणालीनंतरही शिक्षकांचे वेतन अनियमितच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:16 PM2022-03-09T14:16:19+5:302022-03-09T14:18:41+5:30
या प्रणालीमुळे वेतन ऑनलाइन स्वरुपात शिक्षकांच्या बँक खात्यावर २४ तासांत जमा होणे अपेक्षित आहे, त्यानुसार एका महिन्यात जमा झालेदेखील. त्यानंतर मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले.
सांगली : प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत करण्यासाठी शासनाने सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोटक्ट) प्रणालीचा अवलंब केला; पण त्याच्या फायद्याऐवजी त्रासच जास्त होऊ लागला आहे. वेतन १५ ते २५ तारखेपर्यंत लांबणीवर पडू लागले आहे.
नोव्हेंबर महिन्यात सीएमपी प्रणालीचा अंगिकार करण्यात आला. जिल्हा परिषदेपासून गटशिक्षणाधिकारी आणि शेवटी केंद्रप्रमुख असा वेतनाचा आठवडाभराचा प्रवास नियंत्रणात आणण्याचा हेतू होता. या प्रणालीमुळे वेतन ऑनलाइन स्वरुपात शिक्षकांच्या बँक खात्यावर २४ तासांत जमा होणे अपेक्षित आहे, त्यानुसार एका महिन्यात जमा झालेदेखील. त्यानंतर मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले.
शासनाकडून निधी दिला जात नसल्याने सीएमपी प्रणाली कुचकामी ठरली आहे. पैसे आल्याशिवाय प्रणालीचा उपयोगच होत नाही. सामान्यत: १ तारखेला वेतन अपेक्षित आहे; पण अनेकदा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेतन होत असल्याचा शिक्षकांचा अनुभव आहे. याचा फटका कर्जदार शिक्षकांना बसत आहे. वेतन होताच कर्जाचा हप्ता बँकेत जमा होतो; पण सध्या वेतन उशिरा होत असल्याने नाहक व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
सीएमपी प्रणालीमुळे वेतन वेळेत होण्याची अपेक्षा होती; पण भ्रमनिरास झाला आहे. वेतन जमा होईल, त्याचदिवशी बँकेच्या कर्जाचा हप्ता जमा व्हावा, अशी शिक्षकांची मागणी आहे. सध्या वेतन लांबत असल्याने भुर्दंड सोसावा लागत आहे.- परशुराम जाधव, तालुकाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना, मिरज