मैदान जाहीर होण्यापूर्वीच शिराळ्यात दोघांचा शड्डू : विधानसभेला कुस्त्यांचा फड रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:16 PM2018-05-12T23:16:22+5:302018-05-12T23:16:22+5:30
अशोक पाटील ।
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याअगोदरच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी शड्डू ठोकले आहेत. भाजपची लांग बांधून आमदार शिवाजीराव नाईक यांनी तयारी केली आहे. पेठनाक्यावरील वस्ताद नाना महाडिक यांनी आमदार नाईक यांचा खुराक बंद करून स्वत:चा पठ्ठा सम्राट महाडिक याला थंडाईचा रतीब लावला आहे. सम्राट यांनीही कसून सराव सुरू केला असून यंदाचे मैदान कोण मारणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी गोरक्षनाथ यात्रेनिमित्त शिराळ्यात लाल मातीतील कुस्त्यांचे मैदान भरवून आमदार शिवाजीराव नाईक यांना आव्हान देत शक्तिप्रदर्शन केले. स्थानिक पातळीवर दोन भाऊंची समझोता एक्स्प्रेस हातात हात देऊन सुसाट असतानाच, सत्यजित देशमुख यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सागाव येथील ५0 वर्षांपासून बंद असलेले कुस्त्यांचे मैदान पुन्हा सुरू करुन देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना, ‘यावेळी तुम्ही थांबा आणि मला मदत करा’, असा अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे या दोघांचे वस्ताद आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
शिराळा येथील कुस्ती मैदान दोन्ही काँग्रेसच्यावतीने एकत्रित होणार होते. परंतु काँग्रेसच्या काहींनी याला आक्षेप घेतला. हे राजकारण पेटले असताना भाजपचे रणधीर नाईक यांनी धार्मिक यात्रेत कुस्ती मैदानाचे राजकारण करु नका, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तिन्ही गटात राजकारण रंगले होते. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत तिन्ही गट विधानसभेची रंगीत तालीम करत आहेत.
महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनी जोर, बैठका काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यापाठोपाठ नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले चिकुर्डेचे अभिजित पाटील यांनीही शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे शिराळा येथील विधानसभा कुस्तीचा फंड चांगलाच रंगणार हे आतापासूनच स्पष्ट होत आहे.
त्या ४९ गावांनाही निवडणुकीचे वेध
शिराळा मतदार संघात वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांचा कधीच विचार घेतला जात नाही. विधानसभेची सुगी अली की मग आमदार शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांना या गावांची व तेथील पदाधिकाऱ्यांची आठवण येते आणि हे सर्वच नेते तेथील सुख-दु:खाच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळे ४९ गावांतील पदाधिकाºयांनाही शिराळा विधानसभेचे वेध लागले आहेत.