संचारबंदीच्या काळातही १८,५८५ पॉझिटिव्ह, पंधरा दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:40+5:302021-05-05T04:44:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संचारबंदीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ५८५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संचारबंदीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ५८५ लोक पॉझिटिव्ह आले आहेत. संचारबंदीतही नागरिकांचा सुरू असलेला मुक्तसंचार या गोष्टीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती. या काळात लोकांच्या संचाराला आळा बसून संसर्ग कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, चित्र उलटेच झाले आहे. संचारबंदीच्या काळापूर्वी असलेल्या आकडेवारीपेक्षा संचारबंदीतील कोरोनाची आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. या काळात पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर अधिक दिसून येत आहे. त्यामुळे संचारबंदीचे काय फलित मिळाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. संचारबंदीचा हा काळ मोठा होता. आता पुन्हा आठवडाभराचा लॉकडाऊन सुरू झाला असल्याने या काळात तरी गर्दी नियंत्रणात राहणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात सध्या उपलब्ध बेडची संख्या जवळपास संपुष्टात आली आहे. बेड मिळविण्यासाठी लोकांची कसरत सुरू आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीची टंचाई आहे. अशा काळात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे, मात्र, लोकांच्या बेशिस्तपणामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे.
चौकट
ग्राफसाठी
३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग ४३५९३
पॉझिटिव्ह ६,२७९
रुग्णालयातून सुटी २,९५२
या काळातील पॉझिटिव्हीटी रेट १४.४० टक्के
कोरोनामुक्ती दर ५० टक्के
चौकट
१५ एप्रिल ते १ मे टेस्टिंग ८१,५५७
पॉझिटिव्ह १८,०८२
कोरोनामुक्त १०,३००
या काळात पॉझिटिव्हीटी रेट २२.१७ टक्के
कोरोनामुक्तीचा दर ५५.४२ टक्के
चौकट
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नागरिकांचा रस्त्यावर मुक्तसंचार सुरू होता. किराणा माल, भाजीपाला खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी शहरात होती.
बससेवा सुरू असल्याने जिल्ह्याबाहेरील लोक विनातपासणी शहरात, गावांत येत होते. त्यांची तपासणी न झाल्याने त्यांच्यामुळेही संसर्ग वाढला.
लसीकरण केंद्रांवरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. तसेच त्याठिकाणी कोविड चाचणीही सुरू राहिल्याने कोरोनाला निमंत्रण मिळाले.
चौकट
यामुळे वाढले ग्रामीण भागात रुग्ण
ग्रामीण भागातही परजिल्ह्यातून येणाऱ्या लाेकांची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावागावांमध्ये रुग्णसंख्या वाढत गेली.
संचारबंदीपूर्वी अनिर्बंध विवाहसोहळे, त्याठिकाणची गर्दी, स्मशानभूमीत होणारी गर्दी संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरली.