महापुरातही चोरट्यांकडून बंद घरातील वस्तूंवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:11+5:302021-07-31T04:26:11+5:30
सांगली : गेल्या आठवड्यात शहरात निर्माण झालेल्या महापूरस्थितीतही चोरट्यांनी अनेकांच्या बंद घरात प्रवेश करीत मिळेल त्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे ...
सांगली : गेल्या आठवड्यात शहरात निर्माण झालेल्या महापूरस्थितीतही चोरट्यांनी अनेकांच्या बंद घरात प्रवेश करीत मिळेल त्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. महापूर ओसरल्यानंतर नागरिक निवारा केंद्रांतून आपल्या घरी परतल्यानंतर हे चोरीचे प्रकार समोर आले असून, याबाबत पोलिसात नोंद करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारपासून पुराचे पाणी वाढू लागल्यानंतर नागरिकांनी घरातील महत्त्वाच्या वस्तू सोबत घेऊन अथवा सुरक्षित ठेवून निवारा केंद्रात, नातेवाइकांकडे स्थलांतर केले. त्यानंतर पूरस्थिती गंभीरच बनल्याने नागरिकांना बाहेरच थांबावे लागले होते. या कालावधीत चोरट्यांनी मात्र हात साफ करून घेतले आहेत. चोरट्यांनी पुराच्या कालावधीतही मिळेल ती वस्तू लांबविली. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर नागरिक आपल्या घरी परतू लागले तर बुधवारपासून परिस्थिती पूर्ववत होत असल्याने नागरिकांनी पुरामुळे घरात घुसलेला गाळ काढण्यास व स्वच्छतेस सुरुवात केली. या वेळी अनेकांच्या घरात चोरी झाल्याचे प्रकार समोर आले. जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास, शंभरफूटी रोड, गावभाग परिसरात हे प्रकार घडले. पूरस्थितीमुळे दोन ते तीन दिवस कोणीही घरी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डाव साधला.
या कालावधीत पोलीसही पूरस्थिती नियंत्रणात व नागरिकांच्या मदतीतच व्यस्त होते. त्यामुळे पोलिसांनाही पूर ओसरल्यानंतरच चोरट्यांच्या या करामती लक्षात आल्या आहेत. २०१९ च्या महापुरावेळी गावभागात अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडले होते. त्यामुळे या वेळी या भागातील तरुणांनी घरातील ज्येष्ठांना सुरक्षितस्थळी पाठवून स्वत: घरातच मुक्काम केला होता. अशा भागात चोरीचे प्रकार कमी घडले आहेत. दरम्यान, पुराच्या पाण्यातून येत चोरी करणाऱ्या या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसाठीही आव्हानच बनले आहे.
चौकट
चोरट्यांनी या कालावधीत केवळ रोकड वा किमती वस्तूंची चोरी न करता, मिळेल त्या वस्तू लांबविल्या आहेत. अगदी पूजेची पितळी भांडी, पाण्याची टाकी, सळई, संसारोपयोगी साहित्य, कपडे आदींची चोरी केल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.