तासगावात मुदत संपली, तरी स्वच्छता ठेका कायम ठेकेदारीला अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:03 PM2018-07-11T22:03:04+5:302018-07-11T22:03:30+5:30
दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव शहरातील स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत ३० जूनला संपुष्टात आली आहे. तरीदेखील सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदारीला अभय देण्यात आले आहे. कोणतीही मुदतवाढ न देताच शहरात स्वच्छतेचा ठेका रामभरोसे सुरू आहे. स्वच्छतेअभावी शहरात रोगराईने थैमान घातले आहे. जनतेच्या स्वच्छतेबाबतीत तक्रारी आहेत. नगरसेवकांतही नाराजी आहे. त्यामुळे मुदतवाढीच्या निर्णयाबाबत लक्ष लागून राहिले आहे.
शहरात अनेक वर्षांपासून बिव्हीजीकडे शहर स्वच्छतेचा ठेका होता. मात्र गेल्या वर्षी सत्ताधाऱ्यांनी राष्टवादीच्या पदाधिकाºयाला शहर स्वच्छतेचा ठेका बेकायदेशीरपणे दिला. ठेका दिल्यापासून नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने सत्ताधारी विरोधकांकडूनही ठेक्याला विरोध सुरू झाला. राष्टवादीच्या नगरसेवकांनीही ठेक्याला विरोध केला.
स्वच्छतेच्या ठेक्याला विरोध होत असतानाही सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह, नगराध्यक्षांनी ठेकेदाराचे तळ राखण्याचे काम केले. शहरात स्वच्छतेचा बोजवारा सुरू असताना ठेकेदाराला खुलेआमपणे अभय दिले. इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानात पालिकेला चांगेल रॅँकिंग मिळण्यात ठेकदाराचा वाटा असल्याचे कोडकौतुकही केले.
एकीकडे स्वच्छतेचा डर्टी पिक्चर आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदाराला पोसण्याचे उद्योग अशा परस्थितीत ठेकेदाराने एक वर्ष पूर्ण केले. एक वर्षासाठी ठेका देण्यात आला होता. ३० जूनला स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे. मुदत संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी पालिकेच्या सभेत ठराव घेणे अपेक्षित होते; मात्र कोणताही ठराव न घेता मुदतवाढ न देताच शहरात स्वच्छतेचा ठेका सुरू आहे.
एकीकडे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढत आहे. डासांच्या घनतेत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे ठेकेदाराला पाठीशी घालणाºया सत्ताधाऱ्यांकडून ठेक्याची मुदत संपल्यानंतर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वर्षभरापासून सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदाराला मुदतवाढ मिळणार की नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ठेकेदाराच्या बोगसगिरीला नगराध्यक्षांची पाठराखण
स्वच्छतेच्या ठेक्यासाठी वर्षाला एक कोटी रुपये खर्ची पडणार आहेत. हा ठेका घेण्यासाठी निकषांची पूर्तता करून एक वर्ष स्वच्छतेचा ठेका घेतल्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय ठेका मिळू शकत नव्हता. मात्र ठेकेदाराकडून बोगस प्रमाणपत्र जोडून ठेका घेण्यात आला. ही बोगसगिरी चव्हाट्यावर आल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी शहानिशा केली नाही. याउलट बोगस ठेक्याची पाठराखण करून पालिकेत सुरू असणाºया बोगस कारभाराची पाठराखणच सुरू केली. त्यामुळे नगराध्यक्षांच्या या पाठराखणीचे गौडबंगाल काय? असाच प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.