लॉकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:53+5:302021-05-16T04:25:53+5:30

सांगली : कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत असतानाच, संभाव्य तिसरी लाट आणि त्यात लहान मुले लक्ष्य होण्याची शक्यता ...

Even if the lockdown is over, don’t leave the kids out of the house! | लॉकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका!

लॉकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका!

Next

सांगली : कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत असतानाच, संभाव्य तिसरी लाट आणि त्यात लहान मुले लक्ष्य होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या तरी लसीकरणापासून वंचित असलेल्या या घटकाची विशेष काळजी घेणेच आवश्यक बनले आहे. लॉकडाऊन संपणार असला तरीही मुलांना घराबाहेर न पाठविणे, त्यांची काळजी घेणे हेच सध्यातरी पालकांना करावे लागणार आहे.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा हरएक प्रयत्न करत असलीतरी त्याचा धोका अद्यापही कायम आहे. त्यातही कुटुंबातील लहान मुले व त्यांना संक्रमणापासून वाचविण्याचे आव्हान पालकांसमोर आहे. घरासमोर, गल्लीत, अपार्टमेंटमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या या मुलांना संक्रमणाचा धोका आहेच. त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना मास्कची सवय लावणे आवश्यक आहे. शिवाय घरातील एखादी व्यक्ती कामानिमित्त बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीने लहान मुलांपासून दूर राहणे खूपच महत्त्वाचे आहे.

नवजात बालकांपासून १८ वर्षे वयोगटातील मुलांपर्यंत सध्यातरी लसीकरणाची कोणतीही शक्यता नसल्याने व हा वयोगट सर्वांत मोठ्या संख्येने असल्याने या घटकाला कोरोनापासून बचावासाठी कुटुंबातील सदस्यांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सुदैवाने लहान मुलांमधील कोरोना गंभीर स्वरूपाचा नसतो. जी मुले अगोदरपासूनच आजारी आहेत. अनुवंशिक आजारी आहेत त्यांनाच याचा धोका असला तरीही ती गंभीर होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने काळजी नसली तरीही सजगता आवश्यक बनली आहे.

चौकट

आरोग्य यंत्रणेकडून संभाव्य तयारीचा आढावा

लहान मुलांमधील संक्रमणाचा धोका ओळखून महापालिकेच्यावतीने नुकताच शहरातील बोलरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. यात बाल रुग्णांची संख्या वाढल्यास डेडीकेटेड सेंटर सुरू करण्याबरोबरच पालकांच्या समुपदेशानासाठीही तयारी करण्यात आली. शहरातील सर्व बालरोगतज्ज्ञांनी यात सहभागाची तयारी दर्शवली आहे.

लहान मुले उपचारासाठी राहणे अशक्य असल्याने त्यांच्यासोबत आईवडिलांनाही तयार करण्यासाठी व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवजात बालकांना कोरोना संक्रमण होऊ नये यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली.

चौकट

लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षण काय?

१) मोठ्या व्यक्तींपेक्षा लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे पूर्णपणे वेगळी असतात. धाप लागणे, ऑक्सिजनची पातळी खालावणे असे सहसा घडत नाही.

२) भूक न लागणे, मुलांची चिडचीड वाढणे, पोटात दुखणे, शौचास त्रास होणे, काहीवेळेस ताप येणे आदी प्रमुख लक्षणे आहेत.

३) लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर ती गंभीर होण्याची शक्यता खूपच कमी आहे. जी मुले कुपोषित आहेत, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना धोका अधिक आहे.

चौकट

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

कोट

नवजात बालकांपासून १८ वर्षे वयोगटापर्यंत संसर्ग वाढवण्याची भीती आहे. पालकांनी आता मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तत्काळ उपचार सुरू करावेत. आम्हाला कोविड नाही तर आमच्या मुलांना होऊ शकत नाही असे न म्हणता मुलांची काळजी घ्यावी.

डॉ. उज्ज्वला गवळी, बालरोगतज्ज्ञ

कोट

घरातील व्यक्ती बाहेर गेल्यामुळे लहान मुलांमधील संक्रमणाचा धोका वाढत आहे. एकमेकांच्या घरी जाणे टाळण्याबरोबरच बाहेर जाताना मुलांना मास्कची सवय लावून ठेवावी. कोविड चाचणीचा सल्ला दिल्यानंतर डॉक्टर बदलण्यापेक्षा तातडीने चाचणी करून घेण्यास प्राधान्य द्यावे.

डॉ. वसुधा जोशी, बालरोगतज्ज्ञ

कोट

लहान मुलांमधील कोरोना गंभीर पातळीवर जाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषत: अगोदरच आजारी असलेल्या मुलांची विशेष काळजी घेतल्यास लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो.

डॉ. शिशिर मिरगुंडे, जिल्हा टास्क फोर्स सदस्य

Web Title: Even if the lockdown is over, don’t leave the kids out of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.