उन्हाळा वाढला गाईच्या दुधाचे दर जैसे थे, आर्थिक कोंडी, शासन बघ्याची भूमिका- तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:28 PM2018-04-02T23:28:41+5:302018-04-02T23:30:00+5:30
देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील,
अतुल जाधव।
देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील, अशी शक्यता होती; मात्र ही शक्यता फोल ठरली. गाईच्या दूध दरात वाढ न झाल्याने दूध उत्पादकांत नाराजी आहे.
राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ फॅ टसाठी २७ रुपयांचा खरेदी दर जुलै २०१७ पासून लागू केला; पण अनेक दूध संघांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. सहकारी दूध संघांकडून शासनाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. ज्या संघांनी कायद्याच्या भीतीपोटी दरवाढ दिली, त्या दूध संघाच्या संघटनांनी दरवाढ न देण्यासाठी दबाव आणल्याचे चित्र अनेक ठिकाणी निर्माण झाले. या प्रश्नात शासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे.
गेल्यावर्षी शेतकºयांच्या कर्जमाफी आंदोलनावेळी दूध दराचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गाईच्या ३.५ ते ८.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३८ रुपये दर जाहीर केला होता; पण त्यानंतर काही मोजक्या संस्था आणि संघ वगळता अन्य संस्थांनी हा वाढीव दर देण्याबाबत चालढकल केली. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरचे उत्पादन आणि विक्रीतील अडचणीचे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले.
सष्टेंबर २०१७ पासून जिल्ह्यातील सर्व दूध संघांनी गाईच्या दुधाचे दर कमी करण्यास सुरुवात केली. काही संघानी तर गाईच्या ३ फॅ ट दुधाला १८ रुपयेपर्यंत कमी दर दिला. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे भाव वाढतील, अशी शेतकºयांना आशा होती; मात्र या आशेलाही आता सुरुंग लागला आहे.
उन्हाळ्याचे गणित
गेल्या अनेक वर्षांपासून मार्च महिन्यातच दूध दरात वाढ होत होती. पण गेल्या दोन वर्षांपासून दूध दरात वाढ न होता घट होत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या दूध उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी शासन व संघ यांनी दरवाढ करावी, अशी मागणी होत आहे.