हृदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:45+5:302021-03-10T04:26:45+5:30

सांगली : डॉक्टर, मला मधुमेह आहे, लस घेऊ का? मला रक्तदाबाचा विकार आहे, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेतोय, कोरोनाच्या ...

Even if you have heart disease or allergies, you must get the corona vaccine | हृदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायलाच हवी

हृदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायलाच हवी

googlenewsNext

सांगली : डॉक्टर, मला मधुमेह आहे, लस घेऊ का? मला रक्तदाबाचा विकार आहे, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेतोय, कोरोनाच्या लसीकरणाने त्रास तर होणार नाही ना?, मला कोरोना होऊन गेलाय, आता पुन्हा कशाला होतोय? लसीची गरजच नाही! मला हृदयविकार आहे, बायपास शस्त्रक्रिया झालीय, कोरोनाची लस घेऊन जीव धोक्यात कशाला टाकू? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच, कोरोनाची लस कोणालाही अपायकारक नाही, घेतलीच पाहिजे.

तुमच्या-आमच्या प्रकृतीची काळजी वाहणारे डॉक्टरच हा सल्ला देताहेत. अजिबात घाबरु नका, लस टोचून घ्या, सुरक्षित रहाल असा त्यांचा सांगावा आहे. कोरोनाच्या लसीबद्दल अनेक समज-गैरसमज पसरल्याने ती टोचून घेण्यासाठी लोक दबकत असल्याचा अनुभव येत आहे. पण ती शंभर टक्के सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञ डॉक्टरांनीच दिला आहे. हृदयरोगी, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेणारे, वेगवेगळी ॲलर्जी असलेले अशा कोणत्याही विकाराच्या सर्वच रुग्णांनी लस घ्यायला हवी असे ते सांगताहेत. लसीकरणामुळे कोणताही धोका नसल्याचा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनीही लस टोचून घेतली आहे. १ मार्चपासून ज्येष्ठांचे लसीकरण सुरु झाल्यापासून ८०-९० वर्षांवरील वृद्धांनीही घेतली आहे. शिवाय ४५ ते ५९ वयाच्या व्याधीग्रस्तांनीही पहिल्या दोन-तीन दिवसांतच लस घेऊन स्वत:ला कोरोनापासून सुरक्षित ठेवले आहे. लसीचा दुसरा डोसही ते घेणार आहेत. आता तर ग्रामीण भागात आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरु झाले असून अल्पशिक्षित वृद्धदेखील लसीकरणासाठी गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे लस घेण्याने त्रास होईल हा सगळा मनाचा खेळ असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. लोकांमधील अनेक गैरसमजांपैकी एकही खरा झाल्याचे उदाहरण जिल्हाभरात नाही.

चौकट

थंडी, ताप आला म्हणून घाबरु नका...

सामान्यत: कोणतीही लस घेतल्यानंतर सुरवातीचे दोन-तीन दिवस ताप, थंडी असा त्रास जाण‌वतोच. कोरोनाची लसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी केले. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार किंवा अन्य कोणताही आजार असला तरी कोरोनाची लस सुरक्षित आहे. विकारग्रस्तांना कोरोनाचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांनी लसीकरणासाठी प्राधान्याने पुढे यायला हवे असे लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील म्हणाले.

कोट

तज्ज्ञ म्हणतात, बिनधास्त लस घ्या

लसीकरण पूर्ण सुरक्षित आहे. कोरोनातून बाहेर पडलेल्या वृद्धांना पुन्हा कोरोना होऊ शकतो. अगोदरपासून आजार असतील तर कोरोनाचा धोका जास्त संभ‌वतो, त्यामुळे कोणत्याही शंका-कुशंका मनात न ठेवता लस घ्यावी. २८ दिवसांनी दुसरा डोसही घेऊन शंभर टक्के सुरक्षा कवच घेतले पाहिजे. विशिष्ठ कंपनीच्याच लसीसाठी आग्रह धरु नये.

- डॉ. मकरंद खोचीकर, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ, सांगली.

कोरोनाचा वयोवृद्धांना धोका जास्त आहे. मधुमेह, रक्तदाब असे विकार असल्यास कोरोनाने मृत्यूदर वाढतो. त्यामुळे लस प्राधान्याने टोचून घ्यावी. आजवर डॉक्टर्स, पोलिसांनी लस घेतली, पण कोणालाही त्रास झाल्याचे उदाहरण नाही. काहीसा ताप किंवा थंडी वाजली तर बाऊ करु नये. पूर्वीचा आजार आहे म्हणूनही लस टाळू नये.

- डॉ. रियाज मुजावर, हृदयरोग तज्ज्ञ

मधुमेहींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय गुंतागुंतही वाढू शकते. त्याचबरोबर कोरोनामुळे मधुमेह वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेह असला तरी किंवा त्याचे अैाषधोपचार सुरु असले तरीही कोरोनाची लस घेतलीच पाहिजे. प्रत्येक लसीनंतर थोडेसे साईड इफेक्ट होतच असतात, त्यामुळे घाबरुन जाऊ नये. कोरोनापासून बचाव करायचा तर लसीशिवाय पर्याय नाही.

- डाॅ. मिलिंद पटवर्धन, मधुमेह तज्ज्ञ, मिरज.

कोरोनाची लस पूर्ण सुरक्षित आहे. लस घेतल्याने त्रास झाल्याची कोणतीही तक्रार आजवर आलेली नाही. आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी व आता साठ वर्षांवरील ज्येष्ठ असे लाभार्थी लस घेत आहेत, त्यापैकी कोणालाही त्रास झाल्याची नोंद आतापर्यंत नाही. त्यामुळे लस बिनधास्त घ्यावी.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक.

पॉईंटर्स

२४१५०

जणांना आतापर्यंत दिली लस

२२३० इतक्या ज्येष्ठांना दिली लस

Web Title: Even if you have heart disease or allergies, you must get the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.