अखेर शंभर कोटीतील कामांच्या फायली मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 03:39 PM2019-06-13T15:39:29+5:302019-06-13T15:40:28+5:30
शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींमधील विकास कामांच्या दरमान्यतेचे प्रस्ताव अखेर प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी सभेत ४० कामांना मान्यता दिली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी कामांचे प्रस्ताव स्थायीकडे पाठविले जातील, असे प्रशासनातून सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर शंभर कोटींच्या निधीतील कामांना गती येणार आहे.
सांगली : शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींमधील विकास कामांच्या दरमान्यतेचे प्रस्ताव अखेर प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी सभेत ४० कामांना मान्यता दिली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी कामांचे प्रस्ताव स्थायीकडे पाठविले जातील, असे प्रशासनातून सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर शंभर कोटींच्या निधीतील कामांना गती येणार आहे.
महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शंभर कोटीच्या निधीतून २६० विकास कामांच्या निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी २०६ कामांना प्रतिसाद मिळाला होता. उर्वरित ५४ कामांच्या फेरनिविदा काढल्या होत्या. २५ लाखांवरील कामे स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते.
आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात ४० कामांच्या निविदांच्या दरमान्यतेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला. या कामांची दरमान्यता येत्या शनिवारी होणाऱ्या सभेत दिली जाणार आहे. उर्वरित कामांचे प्रस्ताव टप्प्या- टप्प्याने स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहेत.
सभेच्या अजेंड्यावर ३० लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या दोन नवीन शववाहिका खरेदीला मान्यता देण्याचा, तसेच चार वाहन चालकांची मानधनावर नेमणूक करण्याचा विषयही स्थायी समितीच्या सभेत आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ७७ मेट्रिक टन ब्लिचिंग पावडर, १६० टन पीएसी पावडर, ८० टन लिक्विड क्लोरिन गॅस खरेदी करण्यासाठी स्वतंत्र ७६ लाखांच्या निविदा मागविण्याचा विषय चर्चेला आला आहे.
पाणीपुरवठा विभागाकडे दैनंदिन देखभाल, दुरूस्तीचे कामकाज करण्यासाठी सांगली व कुपवाड विभागासाठी २४, तर मिरजेसाठी १५ अशा एकूण ४० कामगारांचा पुरवठा करण्यास एजन्सी नेमण्याची निविदा प्रसिध्द करण्यासाठी मान्यता देण्याचा विषय आहे.
महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी शासकीय दराने ६० हजार देशी प्रजातीची रोपे प्रति ७५ रुपयेप्रमाणे खरेदी करण्याची निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. या विषयाला मान्यता देण्याचा विषय शनिवारच्या सभेत आला आहे.