...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार
By अशोक डोंबाळे | Published: October 27, 2023 12:29 PM2023-10-27T12:29:35+5:302023-10-27T12:30:35+5:30
शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी
सांगली : कऱ्हाड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दि. २७ ऑक्टोबरपासून दुपारी १ वाजेपासून कोयना धरणातून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पण, पाणी कमी गतीने सोडल्यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यास तीन दिवस लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काटच्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नावर आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी १ वाजेपासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू केले आहे.
या युनिटमधून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. पण, कमी गतीने पाणी सोडल्यामुळे सांगलीत पाणी येण्यास किमान तीन दिवस लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यानी कोयना धरणातून किमान दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
विसर्ग वाढविणार : ज्योती देवकर
कोयना धरणातून दुपारी १ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन कोयनेतून विसर्ग वाढविण्याची विनंती धरण व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यानुसार कोयना धरणातून दुपारनंतर आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.