अवकाळीने द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान
By admin | Published: January 5, 2015 12:00 AM2015-01-05T00:00:42+5:302015-01-05T00:34:10+5:30
शेतकरी हवालदिल : जत पूर्वभागात रब्बीही वाया, उत्पादन घटले
गजानन पाटील - दरीबडची -अवकाळी पावसामुळे जत पूर्व भागातील द्राक्षे, डाळिंब व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. भिवर्गी, संख, अंकलगी, करजगी, सिद्धनाथ या भागातील पिकलेल्या द्राक्ष फळबागांचे नुकसान झाले आहे.
घडामध्ये पाणी साचून रोटिंग, मणी गळ झाली आहे, तर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या आगाप पेरणी झालेल्या पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. हुरड्यात आलेल्या ज्वारी पिकाची कणसे काळी पडू लागली आहेत. हरभऱ्याचा फुलोरा गळून पडू लागला आहे. दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
रब्बी हंगाम शेतीचा मुख्य हंगाम आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांची वेळेवर उगवण झाली. शिवारभर पिके बहरली आहेत. काही ठिकाणी आगाप पेरणी झाली आहे. तेथील ज्वारी पीक हुरड्यात आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल होऊन गुरुवारपासून अवकाळीचा पाऊस पडू लागला आहे. अवकाळीचा फटका ज्वारी, हरभरा पिकांना बसला आहे.
ज्वारी काळी पडणे, दाणे भरीव न भरणे व कणसावरील फुलोरा गळून जाणे आदी परिणाम होऊ लागले आहेत. तसेच हरभऱ्याचा फुलोरा झडला जाणार असल्याने घाटे कमी सुटणार आहेत. अवकाळी पावसामुळे जमीन ओलसर होणार आहे. वाढत्या थंडीमुळे ज्वारीवर चिकटा, हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे पिके चांगली येऊनसुद्धा दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे.
पूर्व भागातील भिवर्गी, संख, करजगी, अंकलगी, सिद्धनाथ परिसरातील २०० एकर द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बागा परिपक्व आहेत. त्या बागांवर रोटिंग, मणी गळणे आदी परिणाम होत आहेत. सध्या बाजारात दर चांगला आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. वाढता मशागतीचा खर्च, महागडी औषधे, रासायनिक खतावर लाखो रुपये खर्च झालेले आहेत. तसेच डाळिंबाला पाणी जादा झाल्याने फळे फुटू लागली आहेत. वाढती थंडी, अवकाळी पावसामुळे द्राक्षातील गोडी कमी झाली आहे.