वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे : रविकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:46 PM2019-01-16T23:46:36+5:302019-01-16T23:47:05+5:30
खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत
सांगली : खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत मिरजेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, कटू बोलण्याने कटुता वाढत जाते. एकमेकांशी विसंवाद झाला तर मने दुखावली जातात. दुखावलेल्या मनांमुळे पुन्हा नकारात्मक मानसिकता वाढीस लागते. वैद्यकीयदृष्टीने आपण याची समीक्षा केली तर वाईट बोलण्याचा परिणाम हा शरीरावर वाईटच होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो, रागावतो, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या मनावरही होत असतात. अशा वाईट गोष्टींमुळे शरीरातील वाईट हार्मोन्स कार्यरत होतात. चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे हार्मोन्स प्रत्येकाच्या शरीरात असतात. जेव्हा आपण चांगले बोलतो तेव्हा चांगले हार्मोन्स कार्यरत होऊन हृदयावरचा ताण कमी होतो आणि माणसाला आनंदी वाटत असते. अशी व्यक्ती हृदयरोगापासून स्वत:ला दूर ठेवू शकते.
एखादी व्यक्ती रागाच्या भरात दुसऱ्या व्यक्तीला काही कटू बोलते तेव्हा वाईट हार्मोन्सचा दुष्परिणाम सुरू होतो. हृदयाकडे जाणाºया वाहिन्यांवर ताण येतो आणि हृदयाच्या आजारांना आपण निमंत्रण देण्यास सुरुवात करतो. वास्तविक एका छोट्याशा चुकीच्या कृतीतून आपल्या शरीरावर इतके मोठे दुष्परिणाम होत असतात, याची कल्पना कदाचित अनेकांना नसते. त्यामुळे ते या गोष्टींचे भान ठेवत नाहीत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गोड बोलत राहण्याची सवय अंगीकारली पाहिजे. चांगले शरीर, चांगले हृदय, चांगले आरोग्य आपल्याला हवे असेल तर गोड बोलावेच लागेल. कितीही कटू प्रसंग आले तरी रागावर नियंत्रण ठेवायला हवे. हे नियंत्रण तुमच्या फायद्याचेच ठरणार आहे. याउलट कसल्याही प्रकारचा राग हा शरीरासाठी घातकच ठरू शकतो.सकारात्मक समाज आणि आरोग्यदायी समाजाची निर्मिती करताना आपण सर्वांनी त्याला गोड बोलून, सुसंवाद साधून हातभार लावायला हवा. यामाध्यमातून आपण समाजाचीही सेवा करू शकतो.
‘लोकमत’ने सुरू केलेले हे अभियान अत्यंत चांगले आहे. पुरातन काळापासून जो गोड बोलण्याचा संदेश दिला जात आहे, तो आरोग्यदृष्ट्या प्रत्येकाला व समाजालाही तितकाच लाभदायी आहे. याचा स्वीकार केवळ एका दिवसापुरता नव्हे, तर आयुष्यभर करायला हवा, असे पाटील म्हणाले.