भावेंचा हरहुन्नरीपणा, जिद्द हाच यशाचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:57 PM2017-11-05T23:57:55+5:302017-11-05T23:59:11+5:30
सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. आजच्या अभिनेत्यांनी विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर त्यांना आयुष्यात यश मिळेल. हा पुरस्कार विनम्रपणे स्वीकारत आहे, असे भावोद््गार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी रविवारी काढले.
दरवर्षी अखिल महाराष्टÑ नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ प्रदान करण्यात येते. यंदा हे पदक मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाले होते. रविवारी सायंकाळी भावे नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते जोशी यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी, निर्मला सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृतज्ञता व्यक्त करीत जोशी म्हणाले की, नाटक, सिनेमा, नातेवाईकांच्या भेटीसाठी अनेकदा सांगलीत आलो. गेले दोन दिवस मी सांगलीतच आहे; पण आज या व्यासपीठावर येताना छातीत धडधड सुरु होती. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. वीज संचारावी तसे मी भारावून गेलो आहे. भावे पुरस्काराच्या यादीत आता जयंत सावरकर यांच्यानंतर माझे नाव येणार आहे, त्याबद्दल मी साशंक होतो. पण निवड समितीने माझी एकमताने निवड केली. गेल्या काही वर्षात चांगले काम केले असावे, म्हणूनच माझी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विष्णुदास भावे हे जिद्दी, हरहुन्नरी होते. त्यांच्यातील काही गुण माझ्यातही आहेत. जिद्दीने काम केल्यास ते व्हायलाच हवे, अशी माझी धारणा आहे. भावेंनी हौशी रंगभूमीचा पाया रचला. त्यांच्याकडील जिद्द, हरहुन्नरीपणा आजच्या तरुण अभिनेत्यांनी अंगिकारला, तर त्यांना आयुष्यात मोठे यश मिळेल, असेही जोशी म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात नांदीने करण्यात आली. नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विनायक केळकर, मेधा केळकर, व्ही. जे. ताम्हणकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, बलदेव गवळी, बीना साखरपे आदी उपस्थित होते. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी आभार मानले.
दरम्यान, सकाळी भावे नाट्यगृहात जयंत सावरकर व मोहन जोशी यांच्याहस्ते नटराजपूजन करण्यात आले. त्यानंतर सांगलीतील हौशी कलाकारांनी नाट्यसंगीत सादर केले.
कलावंतांना पोरके करू नका : सावरकर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष असलेले मोहन जोशी लवकरच परिषदेचे नेतृत्व सोडणार आहेत, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी कार्यक्रमात केला. मोहन जोशी यांच्या मनात सध्या काही वेगळेच चालले आहे; पण नाट्यपरिषदेच्या वादात कलावंतांना पोरके करू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी जोशी यांना केले.
विष्णुदास भावे नावाशी जवळीकता
मोहन जोशी यांनी पुरस्कार सोहळ्यात विष्णुदास भावे यांचा जीवनपट उलगडला. या नावाशी माझी जवळीकता आहे असे सांगत, विष्णू हे माझ्या वडिलांचे नाव आहे, तर भावे हे आईकडचे आडनाव असल्याचे सांगताच, रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली.